चहा आणि कॉफी आरोग्यास हानिकारक
भारतामध्ये चहा प्रेमी लोकांना फक्त हिवाळ्यातच नाही तर प्रचंड उष्णतेमध्येही चहा प्यायला आवडतो. पण आता टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. चहा पीत असाल तर जरा जपून राहा. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (ICMR) ने भारतीयांसाठी आहाराशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये निरोगी जीवनासोबतच विविध आरोग्यदायी आहारावर भर देण्यात आला आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) च्या संशोधन शाखा वैद्यकीय पॅनेलने म्हटले आहे की, चहा आणि कॉफीचा वापर मर्यादित असावा तसेच लोकांना जेवणापूर्वी आणि जेवणानंतर चहा पिण्यास मनाई केली आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, चहा आणि कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. जरी संशोधकांनी त्याच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली नसली तरी त्यांनी कॅफिनच्या प्रमाणाबद्दल सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
शास्त्रज्ञांनी सांगितले की, एक कप कॉफीमध्ये ८०-१२० मिलीग्राम कॅफिन असते आणि इन्स्टंट कॉफीमध्ये ५०-६५ मिलीग्राम कॅफिन असते. चहाबद्दल बोलायचे झाले तर त्यात ३०-६५ मिलीग्राम कॅफिन असते. शास्त्रज्ञांनी चहा आणि कॉफीचे सेवन करण्यास मनाई केली आहे जेणेकरून एका दिवसात ३०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिन शरीरात प्रवेश करू नये.
एक व्यक्ती एका दिवसात ३०० मिलीग्राम कॅफिन सहन करू शकतो. याचे प्रमाण अधिक झाल्यास ते शरीरासाठी हानिकारक असू शकते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, व्यक्तीने जेवणाच्या किमान एक तास आधी आणि नंतर कॉफी आणि चहा पिणे टाळावे. कारण कॉफी आणि चहामध्ये टॅनिन नावाचे संयुग असते, त्याचे सेवन शरीरात लोह शोषण्यास अडथळा आणते.
लोहाच्या कमतरतेमुळे, एखाद्या व्यक्तीच्या शरीरात ॲनिमियासारखी परिस्थिती विकसित होते. त्यामुळे शरीरात थकवा जाणवणे, दम लागणे, वारंवार डोकेदुखीची समस्या, हृदयाचे ठोके वाढणे, त्वचा फिकट पडणे, यासारखी लक्षणे जाणवू लागतात. त्यामुळे चहा आणि कॉफीचे सेवन शक्यतो टाळावे.





