समाजपरिवर्तन आणि क्रांतीचा केंद्रबिंदू-“त्याग आणि मैत्री”..!!
मुंबई :
कार्यकारी संपादक : विजय उत्तमबाई कांबळे यांच्या लेखणीतून…

“कार्ल मार्क्स इन सोहो” हे नाटक खूपच वैचारिक होतं. ज्यांना मार्क्सची घृणा आहे त्यांनी एकदा नक्कीच हे नाटक बघावं. कारण कार्ल मार्क्स आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील साम्य नक्कीच या नाटकाच्या माध्यमातून कळेल.
जे आयुष्य बाबासाहेब जगत होते जवळपास तसंच आयुष्य कार्ल मार्क्स जगत होते म्हणजे त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं खडतर होतं ते या नाटकाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं मला आढळून आलं.
मार्क्स ने सुद्धा त्याची ३ मुलं गमावली आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ मुले गमावली ते फक्त आणि फक्त समाज परिवर्तन झाले पाहिजे, सर्वाना न्याय मिळालं पाहिजे एवढ्यासाठी दोघेही झटले हे नाटक बघून समजून आले,आणि हो दोघांच्याही जीवनसंगिनींनी त्यांना कशी साथ दिली तेही समजायला सोपं जातं.
अक्षरशः कार्ल मार्क्स यांना आपले पायातले बूट सुद्धा गहाण ठेवून आपले घर चालवावे लागले आणि त्या सर्व संघर्षात त्यांच्या जीवनसाथी म्हणजेच पत्नी खंबीरपणे त्यांना साथ देतात. कोणतेही दुःख त्या सहजतेने झेलतात आणि आपल्या जोडीदाराला खंबीरपणे साथ देतात.
आणि या दोघीही आपल्या साथीदाराच्या संघर्षात साथ देता देता त्यांच्या आधी आपले आयुष्य गमावतात. यासोबतच दोघीनींही आपले अपत्य गमावले मग ती माता रमाई असो की जेनी पण त्यांनी कधीही आपल्या पतीने फक्त स्वतः च्या घरासाठी जगावं याचा अट्टाहास धरलेला दिसत नाही.
बाबासाहेबांनी आपल्या मुलाला माता रमाईच्या साडीच्या तुकड्यात गुंडाळून अंत्यविधी केला तर कार्ल मार्क्स यांनी आपल्या मुलाचा अंत्यविधी करण्यासाठी २ डॉलर कर्ज काढले असे नाटकात दिसून आले. याचाच अर्थ की महान काम करणाऱ्यांच्या पाठीशी जोपर्यंत त्यांची सहचारिणी सोबत नसते तोपर्यंत आपण समाज परिवर्तनाचे काम यशस्वीपणे पार पाडू शकत नाही. कार्ल मार्क्स त्याच्या पत्नीच्या म्हणजेच जेनीच्या अंत्यविधीला सुद्धा जावू शकले नाही कारण त्यांना कडाक्याच्या थंडीमुळे घराबाहेर पडणे श्यक्य नव्हते. कारण तेही आजारग्रस्थ होते. पण फ्रेडरिक एंगल्स पोचला आणि तो त्या क्षणीच मनाला की जेनी सोबत मार्क्स सुद्धा मेला. याचा अर्थ मार्क्स आणि जेनी किती एकजीव होते हे यावरून दिसून येते. मार्क्सच्या प्रत्येक कार्यात तिही तितकीच सहभागी होती.
मला माता रमाईचे संघर्ष माहिती होते कारण मी त्याचं जातीत जन्मलो. पण आज या नाटकामुळे जिला जातच नव्हती अशा “जेनी” च्या संघर्षाचीही कहाणी मला कळली. नाटकात काय काय दाखवलं मी जास्त खोलात जावून सांगितलं नाही. कारण हे नाटक प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. मार्क्स आणि एंगल्स यांची मैत्री सुद्धा समजली पाहिजे. एका मित्रामुळे एखादा मित्र कसा जगात क्रांतीचे बीजे रोवणाऱ्या विचारांना जन्म देवू शकतो हेही थोडंफार समजण्यास मदत होईल एवढं मात्र माझं खात्रीपूर्वक मत आहे.
बुद्ध असो, मार्क्स असो की बाबासाहेब किंवा अन्य कोणी असो, ज्याला खरंच जग बदलायचं असतं, ज्याला खरंच क्रांती ज्याला करायची असते त्याला आपलं सर्वस्व पणाला लावावं लागतं, तेव्हाच कुठेतरी त्यांच्या विचारांवर क्रांती होवू शकते….!! ते म्हणजे “बुद्धला राजा बिंबिसार, मार्क्सला एंगल्स, फुलेंना वस्ताद लहुजी साळवे आणि बाबासाहेब यांना राजश्री शाहू महाराज, लेनिन ला स्टॅलिन तर फिडेल कॅष्ट्रोला चे गुएरा” सारखे मित्र मिळाले म्हणून त्या त्या देशात किंवा त्या त्या विचारांवर क्रांत्या झाल्या…!!




