महिला सशक्तीकरणाचा बाजार


आपली  भारतीय  संस्कृती  ही पुरुषप्रधान  संस्कृती  आहे. भारतीय  संविधानाने  महिलांना समान  अधिकार  दिले  आहेत. आज  महिला  वर्ग  देखील  पुरुषांच्या  खांद्याला  खांदा  लावून  प्रत्येक  क्षेत्रात पुढे  जात  आहेत. आज  महिला  सक्षमीकरणावर  भर  दिला  जात  आहे.  सरकार  महिलांसाठी  नवनवीन  योजना  अंमलात  आणत  आहेत.  जेणेकरून  महिला  सबळ  आणि  सक्षम व्हाव्यात.

पण  खरंच  का  हो  आज  महिला  सबळ  आणि  सक्षम  झाल्या  आहेत  का ?

उत्तर  प्रदेशातील  हाथरस  गावात  एका १९ वर्षीय  मुलीवर  काही  नराधमांनी  सामूहिक  बलात्कार  केला. दिल्ली  सारख्या  महानगरात  22 वर्षीय  तरुणीला  ती आणि तिचा  मित्र  प्रवास  करत  असलेल्या  एका  खाजगी बसमध्ये  मारहाण,  सामूहिक  बलात्कार  आणि  छळ  करण्यात  आल्याची  घटना  घडली.  बसमध्ये  चालकासह  इतर  सहा  जण  होते,  या  सर्वांनी  महिलेवर  बलात्कार  केला  आणि  तिच्या  मित्राला  मारहाण  केली. या घटनेला  निर्भया  या  नावाने  ओळखले  जाऊ  लागले.  तसेच  उन्नाव,  उत्तर प्रदेश  येथे  एका 17 वर्षीय मुलीवर  सामूहिक  बलात्कार  करण्यात  आला.  मुंबई  सामूहिक  बलात्कार,  ज्याला  शक्ती  मिल्स  सामूहिक  बलात्कार म्हणूनही  ओळखले  जाते,  त्या  घटनेचा  संदर्भ  देते  ज्यात  मुंबईतील  एका  इंग्रजी  भाषेतील  मासिकात इंटर्निंग  करणाऱ्या 22 वर्षीय  फोटो  पत्रकारावर  पाच  जणांनी  सामूहिक  बलात्कार  केला  होता.  अहमदनगर जिल्ह्यातील  कर्जत  तालुक्यातील  कोपर्डी  गावात  तीन  नराधमांनी  एका 14  वर्षीय  मुलीवर  बलात्कार  आणि त्यानंतर  तिची  हत्या  करण्यात  आली.  अहमदाबादजवळील  रंधिकपूर  गावात 21 वर्षीय  महिलेवर  सामूहिक बलात्कार  झाला,  तर  तिच्या  कुटुंबातील  सात  जणांची  हत्या  करण्यात  आली.  तसेच  सोशल  मीडियावर  मणिपूर  येथील  घटनेचा  30-सेकंदाचा  एक  व्हिडिओ  उदयास  आला,  ज्यामध्ये  दोन  अस्वस्थ  महिलांना  विवस्त्र  करून  शेतातून  परेड करण्यात  आल्याने  पुरुषांचा  एक  गट  टाळ्या वाजवताना दिसत होता,  चालत असताना महिलांचा विनयभंग करण्यात  येत  होता.  यालाच म्हणावे का   महिला  सक्षमीकरण.  वर्षानुवर्षे  पीडितांना  न्याय  मिळत  नाही  यासाठी जबाबदार  कोण?  आपल्याच  समाजातील  बाहुबली  लोकं  पैशांच्या  जोरावर  न्यायव्यवस्थेवर  दबाव  आणतात.  त्यामुळे  पीडितांना  न्याय  मिळण्यासाठी  वर्षानुवर्षे  प्रतीक्षा  करावी  लागते.  देशातील  महिला आयोग  फक्त  नावालाच  आहेत.

नुकताच घडलेल्या कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवरील अमानुष बलात्कार. काय चूक होती त्या बिचारीची. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करून डॉक्टर म्हणून कार्यरत असताना तिच्यावर एका नराधमाने अमानुषपणे बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. आयुष्यभर एव्हढी मेहनत करून, बरीच अशी स्वप्ने उराशी बाळगून कार्य करत असताना क्षणार्धात तिचे आयुष्य एका नराधमाने त्याच्या वासनेपायी उध्वस्त केले. काय म्हणावे तरी काय या विकृत मानसिकता असणाऱ्या लोकांना.

Advertisement

काही वेळा तर अपराध करून देखील अशा लोकांची जामिनावर सुटका होते, का तर काही लोकं ही पैशेवाल्यांची असतात तर काही राजकीय. अपराध करणारा व्यक्ती हाच अपराधी आहे हे सिद्ध होण्यासाठी देखील वर्ष लागतात. अपराध करणारा व्यक्ती जर गडगंज श्रीमंत असेल किंवा त्याला राजकीय पाठबळ असेल तर अशावेळी पुरावे नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. पोलीस यंत्रणा जर आपले काम व्यवस्थित करत असेल तर त्यांच्यावर राजकीय दबाव टाकला जातो, हेही तितकेच सत्य आहे. वकिलांचे काम आरोपीला त्याने केलेल्या गुन्ह्याची सजा जास्तीत जास्त कशी देता येईल हे पाहणे आहे. पण पैशांच्या हव्यासापोटी कायद्याचे रक्षक म्हणजेच वकील देखील मोठया तोऱ्याने त्यांची बाजू मांडतात. ही मोठी शोकांतिका आहे. बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यापेक्षा त्याला कठोरातील कठोर सजा कशी देता येईल याचा विचार न्यायपालिकेने करावा जेणेकरून कुठलाच व्यक्ती असा गुन्हा करण्यापूर्वी विचार करेल. घटना घडल्यानंतर We want Justice म्हणण्यापेक्षा किंवा मेणबत्ती जाळून कँडल मार्च काढण्यापेक्षा अशा नराधमाला जागेवर शिक्षा देण्यात यावी.

एव्हढे  सर्व  उदाहरण  पाहिल्या  नंतर  मनात  एक  प्रश्न  नक्की  पडतो  आणि  तो  म्हणजे  खरंच आज  महिला  सबळ  आणि  सक्षम  झाल्या  आहेत  का ?  एके  ठिकाणी  आपण  महिला  सक्षमीकरणाच्या वार्ता  करतो  आणि  दुसऱ्या  ठिकाणी  अशा  घटना  घडणे  खरोखरच  लज्जास्पद  आहे.  एकीकडे  आपण  बेटी बचाव  बेटी  पढाओ  चे  नारे  देतो  आणि  त्याच  बेटीच्या  सुरक्षिततेवर  आज प्रश्चचिन्ह  आहेत?  महिला  तर सोडा  पण  लहान  बालके  देखील  सुरक्षित  नाहीत.  मुलगा  पाहिजे  म्हणून  स्त्रीभ्रूण  हत्या  केली  जाते . महिला म्हणजे  उपभोगाची  वस्तू  हि  विकृत  मानसिकता  अजूनही  डोक्यात घर  करून  आहे  भले  कितीही  आम्ही सक्षमीकरणाच्या  वार्ता  केल्या  तरी  देखील  हि  प्रवृत्ती  जोपर्यंत  आपल्या  मनात  घर  करून  आहे  तोपर्यंत महिला  सक्षमीकरणाची   व्याख्या  करणे  चुकीचे  आहे.  प्रत्येक  क्षेत्रात  मग  ते  कोणतेही  असो  सर्वच  ठिकाणी महिलांना  पुरुषांच्या  वासनांध  नजरेला  बळी  पडावे  लागते.  (कटू  आहे  पण  सत्य  आहे).  मग  अशा परिस्थितीत  मूठभर  महिला  सोडल्या  तर  बाकी  महिलांच्या  विकासाचा  ग्राफ  हा  फक्त  कागदावर  आणि बॅनरवरच  दिसून  येतो.

थोडक्यात  सांगायचे  झाल्यास  महिला  सक्षमीकरण  हा  भारतीय  समाजाचा  सर्वात  महत्त्वाचा मुद्दा  आहे.   महिलांमध्ये  देशाचे  नेतृत्व  करण्याची  क्षमता  आहे.  देशाला  सक्षम  बनवण्यासाठी  महिला सशक्त होणे गरजेचे आहे . राष्ट्रातील  महिलांचे  सक्षमीकरण  प्रत्यक्षात करणे  गरजेचे  आहे.  महिला  सक्षमीकरण  हा  देशाच्या  विकासाचा  मार्ग  आहे.

आपल्या घरात जर अशी घटना घडली तर… या गोष्टीची कल्पना देखील करवत नाही. या गोष्टींचा लोकांनी विचार करण्याची खरी गरज आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!