बलात्कार आणि ऍट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात महिलेला साडे सात वर्षांची शिक्षा..!!
लखनौच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निर्णयात एका २४ वर्षीय महिलेला खोटा सामूहिक बलात्कार व अनुसूचित जाती जमाती-अत्याचार कायद्या अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल सडे सात वर्षाची शिक्षा आणि २.१ लाखाचा दंड ठोठावला आहे. सदर महिलेचे नाव रेखा असून तिचे राजेश नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. या दोघांच्या नात्यात कटुता आल्यानंतर रेखाने राजेश व त्याचा मित्र भूपेंद्र कुमार यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि ऍट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक होऊन ते दोघेही तीन महिने तुरुंगात होते. पोलिसांनी सखोल चौकशी करून सदर महिलेने केलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले.
रेखाने पोलिसांच्या या अहवालाला विरोध केला. पुन्हा हा खटला न्यायालयात चालविण्यात आल्यानंतर न्यायालयाने राजेश व त्याचा मित्र भूपेंद्र यांची निर्दोष मुक्तता केली. याउलट रेखाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८२ (लोकसेवकाला खोटी माहिती देणे) व २११ (खोटा गुन्हा दाखल करणे) अंतर्गत दोषी ठरविले. लखनौच्या विशेष न्यायालयाचे न्या. विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी रेखाला सडे सात वर्षाचा तुरुंगवास आणि २.१ लाखाचा दंड ठोठावला.
SC /ST कायदा, पॉक्सो व इतर संवेदनशील कायद्याचा गैरवापर केला गेला तर जनतेचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होईल असे न्यायालय म्हणाले. तसेच कायद्याचा उपयोग सुदासाठी न करता संरक्षणासाठीच व्हायला हवा असे देखील न्यायालय म्हणाले. तपास अधिकाऱ्यांच्या निष्पक्ष आणि दर्जेदार तपासाची न्यायालयाने प्रशंसा केली.





