मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावत “BEST” भाडेवाढ..!!
मुंबई : महागाईच्या झळा सोसणाऱ्या मुंबईकरांना बेस्ट प्रशासनाने अजून एक झटका देत त्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. सर्व सामान्यांना परवडणाऱ्या बेस्ट वाहतूकच्या तिकीट दरात दुप्पट वाढ करून मोठा झटका दिला आहे. आजपासून (शुक्रवार) ही वाढ करण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमुळे प्रलंबित असलेल्या बेस्ट च्या तिकीट दर वाढीला हिरवा कंदील देण्यात आला. तब्बल आठ वर्षानंतर ही भाडेवाढ करण्यात आले आहे. म्हणजेच पाच रुपयांचे किमान भाडे हे १० रुपये आणि सहा रुपयांचे किमान भाडे हे १२ रुपये असणार आहे.
शिवाय २००९ मध्ये बंद करण्यात आलेले हाफ तिकीट ५ ते १२ वयोगटाच्या मुलांसाठी पुन्हा चालू केले आहे. तसेच महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरून म्हणजेच टोल नाक्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना २ रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
दैनंदिन आणि मासिक पासच्या रूपाने प्रवासी अमर्याद स्वरूपात प्रवास करू शकतात. दैनंदिन पासचे शुल्क ६० वरून ७५ रुपये तर मासिक पासचे शुल्क ९०० वरून १८०० करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिकांना ६०, ९०, आणि १२० बस फेऱ्यांसाठी मासिक पासमध्ये ५० रुपयांची सवलत मिळणार आहे. अंध आणि ४० टक्के तसेच त्यापेक्षाही अधिक टक्केवारी असणाऱ्या अपंग प्रवाशांच्या मोफत प्रवासाच्या सुविधेत कोणताही बदल झालेला नाही.
| बस भाडे टप्पा (किमी) | नवीन भाडे (नॉन एसी) | नवीन भाडे (एसी) |
| ५ | १० | १२ |
| १० | १५ | २० |
| १५ | २० | ३० |
| २० | ३० | ३५ |
| २५ | ३५ | ४० |
| ३० | ४० | ४५ |
| ३५ | ४५ | ५० |
| ४० | ५० | ५५ |
| ४५ | ५५ | ६० |
| ५० | ६० | ६५ |





