क्रांती नगर मध्ये नशेच्या आहारामुळे तीन तरुणांची आत्महत्या..!!


मुंबई : क्रांती नगर, कांदिवली पूर्व याठिकाणी राहणारा धीरज राजभर (वय १८) या तरुणाने झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नशेच्या आहारामुळे धीरजने ही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे. कांदिवली पूर्व येथील क्रांती नगर आणि दामू नगर हा प्रचंड लोकवस्ती असलेला स्लम भाग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चरस, गांजाची विक्री केली जाते. यामुळे युवा वर्ग नशेच्या आहारी गेला आहे. बाजूलाच लागून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगराळ भाग आहे. याच निर्मनुष्य जागेत १६ आणि १९ एप्रिल रोजी दोन तरुणांनी नशेच्या आहारामुळे आत्महत्या केली होती.

Advertisement

त्यानंतर मंगळवार २२ एप्रिल रोजी क्रांती नगर येथील अनुदत्त विद्यालयाच्या मागे असलेल्या ओसाड जागेतील एका झाडाच्या फांदीला एक तरुण गळफास घेऊन लटकत असताना तेथील मुलांना दिसला. याची माहिती लगेचच पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपमृत्यूची नोंद केली. नशेत बुडालेल्या तीन तरुणांनी आत्महत्या केल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आत्महत्यांमागे अति नशेमुळे आलेले नैराश्य आहे असे बोलले जात आहे. चरस, गांजा विकत घेण्यासाठी युवा वर्गामध्ये चोऱ्या करण्याचे प्रमाण देखील वाढले असल्याचे दिसून येत आहे.

या आत्महत्यांमुळे चरस गांजा विकणाऱ्यांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करेल हे पाहणे महत्वाचे आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!