पंकजाताईंचा पराभव समर्थकांच्या जिव्हारी


बीडमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यात चुरशीची लढत झाली. लोकसभा निवडणुकीत बीड जिल्हा हा केंद्रस्थानी होता. मात्र या लढाईत बजरंग सोनावणे यांनी बाजी मारली आहे.

बीड जिल्हा हा भाजप आणि पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला असल्याचे मानले जात होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या बालेकिल्य्यावर महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा फडकवला आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणामुळे देखील तेथील राजकीय समीकरणे बदललेली होती. मात्र याचा फटका पंकजा मुंडे यांना बसला आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

मात्र, पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातील झालेला पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे चित्र दिसत आहे. या सगळ्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून बीड जिल्ह्यात सातत्याने तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. पंकजाताईंच्या या पराभवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील एक-एक शहर बंद ठेवून निषेध व्यक्त केला जात आहे.

Advertisement

तसेच पंकजा मुंडे यांच्याबाबतची आक्षेपार्ह पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रथम पाथर्डी शहर बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर शिरुर-कासारमध्ये देखील बंद पाळण्यात आला होता. यानंतर परळी आणि वडवणी भागात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यानंतर आता आज समर्थकांनी केज बंदची हाक दिली आहे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक शहरात टप्प्याटप्प्याने बंद ठेवले जात आहे. मात्र या बंद आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान निर्माण झालेला तणाव अद्याप निवळलेला नसल्याचे यामधून दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरुन बीडकरांना तणाव कमी करण्याचे आवाहन देखील केले होते. मात्र, त्यांच्या या आवाहनाचा फारसा फरक झालेला नाही. सोशल मीडियावर सातत्याने वादग्रस्त पोस्ट देखील व्हायरल होत आहेत. मात्र पोलिसांकडून याविरोधात कारवाई केली जात असली तरी कोणताही तोडगा निघालेला नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!