राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापन दिन साजरा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन साजरा केला. या वर्धापन सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. राज्यात राष्ट्रवादी गटात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच वर्धापन दिन दोन्ही गटाने साजरी केला आहे.
मुंबईत अजित पवार गटाकडून झालेल्या वर्धापन सोहळ्यात महायुतीमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त १९९९ मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाला पुढे नेण्यात दिलेल्या योगदानाबद्दल शरद पवार यांचे अजित पवारांनी आभार मानले आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार यांची कामगिरी चांगली राहिलेली नसताना देखील अचानकपणे अजित पवार यांचे हे वक्तव्य राजकारणाला पुन्हा एकदा दिशा देणार असल्याचं बोललं जात आहे.
अजित पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदापेक्षा कमी कशावरही समाधान मानणार नाही या राष्ट्रवादीच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. मात्र त्यावेळी ते म्हणाले की आम्ही अजूनही एनडीएचा भाग आहोत. त्यामुळे कसलेही गैरसमज करण्याचे कारण नाही.
अजित पवार म्हणाले, “गेल्या २४ वर्षांपासून पक्षाचे नेतृत्व केल्याबद्दल मी शरद पवारजींचे तसेच पक्षाच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या सर्व दिग्गज नेतेमंडळींचे आभार मानू इच्छितो. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आहेत. जुलै २०२३ मध्ये अजित पवार आणि इतर काही नेते पक्षाविरुद्ध बंड करून महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले.
मात्र असे असताना देखील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी वर्धापन सोहळा अगदी थाटामाटात साजरा केला. सध्याच्या राजकारणावर देखील अजित पवारांनी भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की, संबंध नसताना गैरसमज पसरवण्याचं काम काहीजण करत होते. त्यामुळे येत्या विधानसभेला जोरदार तयारी करून मैदानात उतरणार असल्याचं अजित पवार म्हणाले.





