देवेंद्र फडणवीस राजकारणातील आनंदीबाई
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे, मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे,असं ते म्हणाले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत मविआला मिळालेलं यश आणि महायुतीच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केलं आहे. यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ध्यानाला बसावं आणि चिंतन करावं, आपण काय पाप केले आहेत, काय विष कालवला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचा अभ्यास करावा, जर त्यांना ते आठवत नसेल तर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस राजकारणातील आनंदीबाई आहेत. ज्यांचं काम कपट करणे आहे. त्यामुळे ते राजकारणातील खलनायक झाले आहेत. सरकार फोडण्याचा जो पराक्रम केला, त्यामुळे हे घडलं आहे. त्यामुळे आता नौटंकी करणं बंद करा. त्यांनी केलेल्या पापाचा हा परिणाम आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
लोकसभेच्या निकालाने देवेंद्र फडणवीस यांना जनतेने जबाबदारीतून मुक्त केलेलं आहे. विधानसभेसाठी जर त्यांना मुक्तता हवी असेल, तर त्यांनी लक्षात घ्यावं विधानसभेला महाविकास आघाडी १८५ प्लस जागा जिंकेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर वनवासी आश्रम या ठिकाणी जाऊनच काम करायची वेळ येणार आहे. त्यांनी विष पेरलं ते आता उगवलं आहे, असं राऊत म्हणाले.





