केंद्र सरकारने ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवली
केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ केली होती. केंद्र सरकारने अजून एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि मृत्यू ग्रॅच्युइटी २५ टक्क्यांनी वाढवली आहे. यामुळे ग्रॅच्युइटीची मर्यादा २० लाखांवरून २५ लाख रुपये करण्यात आली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून प्रभावी मानली जाणार आहे.
३० मे २०२४ च्या कार्यालयीन ज्ञापनात म्हटले आहे की, ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या सरकारच्या निर्णयानुसार, केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, २०२१ किंवा केंद्रीय नागरी सेवा, निवृत्ती वेतन प्रणाली नियम, २०२१ या अंतर्गत, १ जानेवारी २०२४ पासून सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि मृत्यू कमाल मर्यादा २५% ने वाढवली जाईल, म्हणजेच २० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये केली जाईल.
यापूर्वी ३० एप्रिल रोजी ग्रॅच्युइटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, ७ मे रोजी परिपत्रक काढून यावर बंदी घालण्यात आली आहे. पण सर्वांना माहिती आहे का? जर एखादा कर्मचारी कंपनीत दीर्घकाळ काम करत असेल तर त्याला पगार, पेन्शन आणि पीएफ व्यतिरिक्त ग्रॅच्युइटी मिळते.
कंपनीकडून कर्मचाऱ्याला मिळालेले बक्षीस आहे. सध्या कोणत्याही कर्मचाऱ्याने किमान ५ वर्षे काम केले असेल तरच त्याला ग्रॅच्युइटी मिळू शकते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.





