मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर ६२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ३० मे च्या रात्री पासून हा ब्लॉक सुरू होईल.
डाऊन फास्ट लाईन साठी ६२ तासांचा तर, अप स्लो लाईनवर १२ तासांचा हा ब्लॉक असणार आहे. दरम्यान, १ आणि २ जूनला सीएसएमटी स्थानकात ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे असे मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी सांगितलं आहे.
सीएसएमटी स्थानकात १० आणि ११ नंबरच्या फलाटची लांबी वाढवण्यासाठी हा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. फलाटाचा विस्तार केल्यानंतर १६ किंवा त्यापेक्षा जास्त डब्यांच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवर थांबवता येतील. तर दुसरीकडे ठाणे स्थानकात देखील एक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ ची रुंदी वाढवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ५ आणि ६ या दोन फलाटाची जर रुंदी वाढवली तर जास्त प्रवासी त्या ठिकाणी उभे राहू शकतील. प्रयत्न असा आहे की, दोन्ही ब्लॉक एकच वेळी घेण्यात यावा, कारण प्रवाशांना एकदाच त्रास होईल, सीएसएमटी येथील ब्लॉक आधीच निश्चित आहे, त्यानंतर आता ठाणे स्थानकावरील ब्लॉकही निश्चित करण्यात आला असून गुरुवारी रात्रीपासूनच हा ब्लॉक सुरु होईल.
किती गाड्या रद्द होणार?
शुक्रवारी, ३१ मे रोजी ४ लांब पल्ल्याच्या गाड्या आणि १८७ लोकल रद्द असणार आहेत.
शनिवारी, १ जून रोजी, ३७ लांब पल्ल्याच्या आणि ५३४ लोकल रद्द असणार आहेत.
रविवारी, २ जून रोजी, ३१ मेल एक्सप्रेस आणि २३५ लोकल रद्द असणार आहेत.
शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या
शुक्रवारी, ३१ मे रोजी, ११ लांब पल्ल्याच्या तर १२ लोकल रद्द
शनिवारी, १ जून रोजी, मेल एक्सप्रेस तर ३२६ लोकल रद्द
रविवारी, २ जून रोजी, १८ मेल एक्सप्रेस आणि ११४ लोकल रद्द
ठाणे आणि सीएसएमटी स्थानकातील ब्लॉकमुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे या विकेंडसाठी जर गरज नसेल, तर प्रवास करू नका. यावेळी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल मोठ्या प्रमाणात रद्द असणार आहेत, परिणामी प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रेल्वेने आसपासच्या महापालिका आणि प्रशासनाला जास्तीत जास्त बस सेवा चालवण्याचं आवाहन केलं आहे, ज्यामुळे प्रवाशांची सोय होईल.





