हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना अलर्ट जारी
गेल्या दोन दिवसांपासून जवळपास बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना बराच दिलासा मिळाला आहे. परंतु हवामान विभागाने पुन्हा एकदा वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे. आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात गारपिटीचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि गारपिटीसह जोरदार पाऊस पडू शकतो. आधीच अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसानं झालं आहे, त्यात आता पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने चिंता अजूनच वाढली आहे.
आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुणे, नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज तर नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी ३ नंतर ताशी ४० ते ६० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शक्यतो नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन देखील करण्यात आले आहे.
कोकण,गोव्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.





