बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन..!!


मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नव्वदाव्या वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. येत्या 8 डिसेंबर रोजी ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार होते. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज (24 नोव्हेंबर) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता त्यांचं पार्थिव विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर आणण्यात आलं. देओल कुटुंबीयांसह स्मशानभूमीवर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि आमिर खानसुद्धा पोहोचले आहेत.

पंजाबमधील लुधियाना इथल्या एका गावात धर्मेंदर केवल कृष्ण देओल यांचा जन्म झाला होता. त्यांनी 1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतत प्रवेश केला. नंतर विवाहित असतानाच धर्मेंद्र हे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं.

Advertisement

वयाच्या 89 व्या वर्षीही ते चित्रपटसृष्टीत आणि सोशल मीडियावर सक्रिय होते. ते अनेकदा निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करायचे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ते ट्रॅक्टर चालवताना, शेती करताना आणि चाहत्यांना आयुष्याचे धडे देतानाचे व्हिडीओ पोस्ट  करायचे.

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांचा ‘इक्किस’ हा शेवटचा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘पत्थर’ आणि ‘घायल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

अशा या महानायकाला “निर्भीड समाचार” तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!