मुंबईच्या जलमय परिस्थितिला जबाबदार कोण?


 

मुंबई : मुंबईत नेहमीच जोरदार पाऊस होतो. त्यामुळे पाण्याचा निचरा नीट होईल, पाणी तुंबणार नाही, रेल्वे बंद वा ठप्प होणार नाही, भूमिगत रेल्वेमध्ये पाणी शिरणार नाही, वाहतूक नीट सु्रू राहील, मुंबईकरांना त्रास होणार नाही, ही जबाबदारी राज्य सरकार व मुंबई महापालिका यांची आहे. पण भ्रष्ट राजकारणी आणि नोकरशहा यांनी या महानगराची पूर्ण वाट लावली आहे.
आजचे संकट निसर्गनिर्मित नसून, राजकारणी व नोकरशहा यांच्यामुळेच आले आहे. त्याचे खापर ते पावसावर फोडतील, नावापुरत्या बैठका घेतील. पाणी साचू नये, त्याचा निचरा व्हावा, यासाठी आणखी कामे कंत्राटदारांना देतील आणि त्यात आपला टक्का काढतील ही लबाड मंडळी.

कामे वेळेत पूर्ण न करणे, ती अर्धवट करणे, केली असल्याचे भासवणे, खोटे दावे करणे आणि विकासाच्या नावाखाली असलेल्या व नसलेल्या कामांमध्ये कंत्राटदारांच्या हातात हात घालून भ्रष्टाचार करणे हेच काम गेली अनेक वर्षे राजकारणी, नोकरशहा आणि अधिकारी करीत आहेत. मुंबईकर काही कोटींचे कर दरमहा देतात. पण भ्रष्ट राजकारणी आणि नोकरशहा सातत्याने मुंबईतील लोकांची फसवणूक करत आहेत. मुंबईकरांना लुबाडत आहे. मेट्रोच्या वरळी स्टेशनमध्ये शिरलेले पाणी असो वा रेल्वे स्टेशन किंवा रस्त्यांवरील पाणी असो, ते यांच्या भ्रष्टाचाराचे व नाकर्तेपणाचे नमुने आहेत.

मुंबईत आज जी स्थिती आहे, तीच परिस्थिती राज्याच्या सर्व भागात आहे. यंदा मान्सूनच्या पहिल्या पावसातच या मंडळींनी राज्यातील लोकांना संकटात ढकलले आहे.

26 मे रोजी नुसत्या मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली. मीडिया जो सांगतोय विक्रमी पाऊस, तो दुपारनंतर, पण मुंबई तर सकाळीच बरबाद झाली, नव्हे ती केली गेली. मुंबईवर पावसाने नव्हे तर सरकारनेच जलात्कार केला आहे.

Advertisement

मुंबईतील नाले सफाईची लाखो करोडोंची कंत्राटे कुठल्या पाण्यात वाहून गेली ? एप्रिल आणि मे मधील नालेसफाईच्या सरकारी पाहणीचे रंगीबेरंगी फोटो कुठल्या रद्दीत दाबले गेले. टेंडर्सचा पाण्यासारखा पैसा कोण्या सरकारी बंगल्याच्या टॉयलेट मध्ये गडप झाला ? कोण देणार याची उत्तरं ?

मुंबईवर गेली अनेक वर्षं आयुक्त राज आहे. तिच परिस्थिती राज्यातील अनेक शहरांची. पण आयुक्तांच्या मागे उभे राहून कोण राज्य करतंय या शहरांवर ? मंत्री, पालकमंत्री, तिथले आमदार, खासदार यांनी या शहरांना वाचवण्यासाठी काय केलंय? पावसाळ्यात मुंबई आणि उपनगरे तुंबणार हे त्यांना माहीतच नव्हते का ? की पहिल्यांदाच त्यांनी मुसळधार पाऊस बघितलाय ? मुंबई, ठाणे, पालघर परिसरात दरवर्षी होणारी जनतेची पाऊसकोंडी नवीन आहे की काय ?

तरीही नेमीची येतो पावसाळा सारखी दरवर्षी तिच परिस्थिती कशी काय उद्भभवते ? दरवर्षी तेच ते मिलन सब वे, कुर्ला, कालीना, खार, वांद्रे, लालबाग, परळ , सायन, धारावी कसे काय पाण्यात जातात ? यंदा तर नवीनच बांधलेले वरळीतील अंडर ग्राउंड रेल्वे स्टेशनही पाण्याखाली गेलंय. आता काय अख्खी मुंबई पाण्याखाली जाण्याची वाट बघतंय सरकार ?

मुंबईची वाहतूक कोलमडल्या बरोबर सगळे मंत्री मुंबई ठाण्याच्या कंट्रोल रूम मध्ये धावून धावून आढावा घ्यायला लागले.पाऊस अनपेक्षितपणे लवकर आल्याची थातूरमातूर कारणं देऊ लागले. विक्रमी पाऊस झाल्याच्या गप्पा हाणू लागले, जणू काही जून जुलै मध्ये पाऊस आला तर मुंबई थांबणारच नाही. रेल्वेला तर बोलायलाच नको. दरवर्षीचा हा राडा त्यांना दिसतच नसावा. त्यांना फक्त मुंबईकरांच्या खिशातला पैसा फक्त दिसत असावा. रेल्वे मंत्री सोडा, साधा अधिकारीही समोर येऊन बोलायला तयार नसतो. आताही कोणी आलं नाही. सगळ्या सरकारी यंत्रणा आणि त्यांच्या आकांनी मुंबईला उध्वस्त करून हात झटकलेत. लोकंही एक दिवस चिडतात. गोर गरीब,मध्यम वर्गाच्या हाल अपेष्टांवर हळहळ व्यक्त करतात आणि निमूटपणे आपल्या कामाला लागतात. या परिस्थितिला कोण जबाबदार?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!