खासदार प्रतिभा धानोरकरांचा धक्कादायक आरोप
राज्यातील लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून प्रतिभा धानोरकर या विजयी झाल्या. मात्र या मतदार संघात अनेक राजकीय उलथापालथ झाली होती. अशातच आता नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा मतदार संघ चर्चेत आला आहे.
चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. येत्या आगामी काळात राज्यात जर सत्ता आली तर मंत्रिमंडळात चंद्रपूर जिल्ह्यातील आमदाराला मंत्रीपद मिळावे, यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. याशिवाय आपल्याला तिकीट मिळू नये यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना आपल्याच पक्षातील लोकांनी सुपारी दिली होती, तसेच पैशाचे आमिष दाखविल्याचा खळबळजनक आरोप यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.
चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या लोकसभा क्षेत्रात ठिकठिकाणी धन्यवाद सभा आयोजित केल्या जात आहेत. अशातच काल संध्याकाळी राजुरा शहरात रॅलीनंतर आयोजित केलेल्या धन्यवाद सभेत बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी हे आरोप केले आहेत. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, राज्यात सरकार आलं तर मंत्रिपद गडचिरोलीला नाहीतर चंद्रपूरला मिळणार यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे गडचिरोली लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या ब्रम्हपुरी मतदार संघाचे आमदार आहेत. त्यामुळे खासदार प्रतिभा धानोरकर त्यांच्या या वक्तव्याचा रोख विजय वडेट्टीवार यांच्याकडेच होता अशा चर्चाना उधाण आलं आहे.
याशिवाय खासदार प्रतिभा धानोरकर सभेत बोलतांना म्हणाल्या की, आपल्याला तिकीट मिळू नये व आपला विजय होऊ नये यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना सुपारी देखील दिली गेली होती, तसेच त्यांना पैशाचे देखील आमिष दाखवले गेले असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.





