“मोदी-शहांचा शेअर मार्केटमध्ये 30 लाख कोटींचा घोटाळा”
लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत भाजपला फक्त २४० जागांवर समाधान मानावे लागले. तर, इंडिया आघाडीने चमकदार कामगिरी करत २३२ जागा प्राप्त केल्या आहेत. इंडिया आघाडीचं पारडं जड होतानाचे दिसताच या दिवशी शेअर मार्केट दणकन खाली आपटलं.
एक्झिट पोलच्या दिवशी शेअर मार्केट वाढलं आणि निकालाच्या दिवशी शेअर मार्केट पडलं.आता यामागे मोठा घोटाळा असल्याचा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळताच काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट शेअर मार्केटमधील घोटाळाच बाहेर काढला आहे.
देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपने केला आहे. त्याची जेपीसी (संयुक्त संसदीय समिती) मार्फत चौकशी करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मीडियाशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी हा घोटाळा बाहेर काढला.
निकाल लागण्यापुर्वी मोदी आणि अमित शाह यांनी शेअर खरेदी करण्यास सांगितले होते. मोदींना वास्तव माहीत होतं. तरीही त्यांनी खोटी माहिती दिली. त्यानंतर मीडियाने देखील खोटे एक्झिट पोल दिले. भाजपच्या अधिकृत सर्व्हेत त्यांना २२० जागा मिळतील हे माहीत होतं. इंटेलिजन्सनेही भाजपला २२० जागा मिळतील असं सांगितलं होतं. पण तरीही मोदी आणि शाह यांनी खोटी माहिती देऊन शेअर खरेदी करण्यास सांगितले. त्यांना यामागे कुणाचा तरी फायदा करायचा होता. असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “मोदींच्या आणि अमित शाह यांच्या आवाहनानंतर शेअर मार्केट डबलने वाढलं. त्यानंतर ३ जून रोजी मार्केट वाढतं. ४ जून रोजी मार्केट पडतं. हे कोण लोक आहेत?, येथे घोटाळा होणार हे त्यांना माहीत होतं. हजारो कोटी रुपये या ठिकाणी गुंतवले गेले. फॉरेन गुंतवणुकदारांनीही गुंतवणूक केली. त्यानंतर ३० लाख कोटी रुपये बुडाले. हा स्टॉक मार्केटमधील सर्वात मोठा स्कॅम आहे.”, असा दावा यावेळी राहुल गांधी यांनी केला.
यावेळी राहुल गांधी यांनी मोदी आणि शाह यांना काही सवाल देखील केले. लोकांना गुंतवणुकीचा सल्ला का दिला? ५ कोटी लोक गुंतवणूक करतात. त्यांना स्टॉक खरेदी करण्याचा आदेश का दिला?, मोदी यांच्या दोन्ही मुलाखती झाल्या. त्या अदानीच्या चॅनलला दिल्या. या चॅनल्सची सेबीची चौकशी सुरू आहे. त्या चॅनलचा मार्केट पडण्यात रोल काय? फेक गुंतवणुकदार आणि फॉरेन गुंतवणुकदारांचा काय संबंध आहे? असे रोखठोक सवाल यावेळी राहुल गांधी यांनी केले आहेत. त्यांच्या या आरोपांनी राजकारण तापण्याची शक्यता आहे.





