किल्ल्याच्या बुरूजावरून सेल्फी घेताना तरूणीचा मृत्यु


अन्न, वस्त्र, निवाऱ्याप्रमाणे आता मोबाईल देखील मुलभूत गरज झाली आहे. मोबाईल हा मनुष्याचा जीव की प्राण झाला आहे. मात्र मोबाईलचा वापर कधी, कुठे,कसा केला जाईल याबाबतचे प्रश्न उपस्थित होताना दिसतात. अशातच धाराशिव जिल्ह्यातील एका किल्ल्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. सेल्फी घेताना नवविवाहित तरूणी किल्ल्यावरून खाली पडली असल्याची माहिती समोर आली.

धाराशिव येथील भुईकोट किल्ल्यात अशीच एक दुर्घटना घडली आहे. सेल्फी घेण्याच्या नादात दहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित तरूणीचा मृत्यु झाला आहे. निलोफर अमीर शेख असे त्या तरुणीचे नाव आहे.

धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग भुईकोट किल्ला हा सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्ल्याची तटबंदी जवळजवळ ३ किमी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरूज आहेत. यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात.

Advertisement

निलोफर अमीर शेख या तरूणीचे अवघ्या दहा दिवसांआधी विवाह झाला होता. त्यानंतर ती पतीसोबत फिरण्यासाठी आली. नळदुर्ग भुईकोट किल्ल्यात उपळाई बुरूजवरून सेल्फी घेताना तिला मोह आवरला नाही. तिचा तोल सुटला आणि ती खाली पडली. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ती तुळजापूर तालुक्यातील हंगरगा गावात राहत होती. तिला नळदुर्ग येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली.

किल्ल्यावर अनेक पर्यटक येत असतात. अशा ठिकाणी डोंगर दर्या, नदी नाले तसेच धबधबे देखील असतात. त्यावेळी सेल्फी काढण्यासाठी अनेक लोकं त्या ठिकाणी जमलेली असतात. यावेळी सेल्फी घेत असताना अनेकांना आपला तोल सावरता येत नाही आणि असे अपघात होण्याची शक्यता असते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!