फडणवीसांच्या OSD वर गंभीर आरोप; मंगेश साबळेंचा पुराव्यांसह दावा!


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगरमधील गेवराई पायगा गावचे सरपंच आणि मराठा आंदोलक मंगेश संजय साबळे यांना प्रशासनाने दोन वर्षांसाठी तडीपारीची (हद्दपारी) नोटीस बजावली आहे. या नोटिशीनंतर साबळे यांनी आक्रमक भूमिका घेत, ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यावर (OSD) गंभीर कारस्थानाचे आरोप केले आहेत. “मराठा आंदोलन मोडीत काढण्यासाठी कोणत्या हॉटेल्समध्ये गुप्त बैठका झाल्या आणि मला शांत राहण्यासाठी काय ऑफर्स आल्या, याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत,” असा खळबळजनक दावा साबळे यांनी केला आहे.

पोलीस प्रशासनाने सावळे यांच्यावर शासकीय कामात अडथळा, धमकावणे आणि खंडणी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा (८ गुन्हे) संदर्भ देत त्यांना हद्दपार का करू नये, अशी नोटीस दिली आहे. मात्र, साबळे यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि डीसीपी पंकज आतुलकर हे राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांचे OSD अधिकाऱ्यांना रसद पुरवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्यासाठी आणि आंदोलन दडपण्यासाठी शासकीय यंत्रणा वापरली जात असल्याचा आरोप साबळे यांनी केला. “हॉटेल्समध्ये झालेल्या गुप्त बैठकांचे सीसीटीव्ही फुटेज आणि ऑडिओ क्लिप्स माझ्याकडे आहेत. जर मी पुरावे जाहीर केले, तर जनता तुम्हाला रस्त्यावर सोडणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, आगामी निवडणुकांमुळे मला जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा हा पूर्वनियोजित कट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

साबळे यांनी पोलीस प्रशासनाच्या या कारवाईला घाबरत नसल्याचे सांगत, “एका साबळेला बाहेर काढाल, तर महाराष्ट्रात हजारो साबळे उभे करेन,” असे स्पष्ट केले. तडीपार झाल्यास राज्यभरात फिरून सरकारच्या धोरणांविरोधात ‘भीक मांगो आंदोलन’ छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दुसरीकडे, डीसीपी पंकज आतुलकर यांनी स्पष्ट केले आहे की, कायदेशीर प्रक्रियेचा आदर न करता साबळे समाजमाध्यमांवर वक्तव्ये करत आहेत. ते वेळेत हजर न राहिल्यास एकतर्फी कारवाई केली जाईल. यापूर्वी अंगावर साडी नेसून जलआंदोलन केल्यामुळे चर्चेत आलेले साबळे, आता थेट OSD वर आरोप केल्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. याप्रकरणी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून गृहखात्याकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मंगेश साबळे यांच्या या खळबळजनक आरोपांमुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनीही या मुद्द्यावरून गृहखात्याला आणि सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. “शासकीय अधिकाऱ्यांचा वापर करून मराठा आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी टीका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली आहे.दरम्यान, मंगेश साबळे यांनी स्पष्ट केले आहे की, ते या नोटिशीला कायदेशीर उत्तर देणार आहेत. परंतु, जर प्रशासनाने राजकीय दबावापोटी एकतर्फी कारवाई केली, तर न्यायालयात जाऊन या सर्व पुराव्यांचा पर्दाफाश करू. त्यामुळे आगामी काळात हे ‘हॉटेल बैठकांचे पुरावे’ आणि तडीपारीचे हे प्रकरण राजकीयदृष्ट्या आणखी तापण्याची चिन्हे आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x