अनुदत्त विद्यालयाच्या मिलिंद जाधव सरांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात साजरा
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
छत्तीस वर्षांची प्रदीर्घ, अविरत आणि समर्पित शैक्षणिक सेवा बजावून ३० सप्टेंबर २०२६ रोजी सेवानिवृत्त झालेले गुरुवर्य मिलिंद गोपाळ जाधव सर यांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन ‘माझी शाळा माजी विद्यार्थी संघ, कांदिवली’ यांच्या वतीने मीरा रोड येथे करण्यात आले. अनुदत्त विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, शिक्षक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात जाधव सर, त्यांच्या सहचारिणी सौ. मिता जाधव आणि सरांच्या मातोश्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला मंगलमय सुरुवात झाली.
यावेळी प्रकाश गायकवाड यांनी जाधव सरांच्या कार्यावर आधारित स्वरचित कविता सादर करून उपस्थितांच्या भावनांना स्पर्श केला. त्यानंतर बबिता सुरवसे, बबिता इंगळे, मानसी गुरव, सुजाता पाटील, कल्पना वाकोडे आणि सुजाता पियाळकर यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने वातावरण प्रसन्न झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पहिल्या टप्प्यात रेखा माळदकर व ममता धुमाळ, तर दुसऱ्या टप्प्यात सतीश जाधव व अभिजित पाळेकर यांनी प्रभावीपणे केले.
यावेळी शाळेतील माजी शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कासार सर, महाजन सर, महाजन मॅडम, अहिरराव सर, कातकडे सर, गोटमुकले सर आणि सतीश स्वामी सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी व नगरसेवक धर्मेंद्र काळे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जाधव सरांच्या आठवणींना उजाळा दिला. दीपक साळवे, विकास कांबळे, प्रकाश गायकवाड, प्रशांत कांबळे, दिलीप मर्चंडे, प्रतीक वानखेडे, प्रज्योत कदम, विकास झाकडे, मानसी सावंत, स्मिता जाधव, वकील. लक्ष्मण रेड्डी, धर्मेंद्र काळे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आठवणी सांगताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर कधी हास्य फुलले.
जाधव सरांचे मित्र प्रा. भास्कर पैठणकर यांनी आपल्या दमदार शैलीत मनोगत व्यक्त करत माजी विद्यार्थी आणि शाळेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच सरांचे मेहुणे संजीव कांबळे व राजीव कांबळे यांनी गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जाधव सरांवरील प्रेमापोटी अनेक माजी विद्यार्थी दूरवरून उपस्थित राहिले. सुजाता पाटील व सिंधू माने या सांगलीहून, तर राजन मांजरेकर कच्छ, गुजरात येथून कार्यक्रमासाठी आले. प्रशांत कांबळे यांनी गावी असतानाही कार्यक्रमासाठी मुंबई गाठली. या उपस्थितीतून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित झाले.
कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी व भावनांचा संग्रह असलेले ‘कृतज्ञतेची शब्दफुले’ हे पुस्तक प्रोजेक्टरवर सादर करण्यात आले. हे पाहताना जाधव सर भावुक झाले. याच वेळी प्रा. कैलास महाजन यांच्या पुस्तकाचे अनावरण जाधव सरांच्या हस्ते करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्ट्या एकमेकांशी जोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘MSMV Business Connect’ वेब पोर्टलचे उद्घाटनही जाधव सरांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर माजी विद्यार्थी परिवारातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जाधव सरांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन मुख्य सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात सरांचा गौरव केला. आपल्या मनोगतात जाधव सरांनी प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासातील अनुभव आणि विचार मांडत उपस्थितांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे पडद्यामागे कार्यरत असलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. अभिजित पाळेकर, महेंद्र, विजय सोमासे, रवींद्र पंदारे, मनोज गुरव, सुनील शिंदे, सतीश जाधव, प्रकाश काळे, राजन, सुहास गायकवाड, दिलीप मर्चंडे, समाधान कांबळे यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. सुहास गायकवाड यांनी तांत्रिक व्यवस्था, प्रोजेक्टर, कॅमेरामन व व्हिडीओग्राफर यांच्यात प्रभावी समन्वय साधला.
महिला सदस्यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोठे योगदान दिले. सुजाता पाटील, सिंधू माने, कल्पना, उषा, अपर्णा, रेखा, ममता, बबिता, मेघना, मानसी, सुजाता, विद्या, निर्मला, शैला आणि सुरेखा यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.
कार्यक्रमात राज हणमंते व प्रेम काळे यांच्या उत्कृष्ट कोरिओग्राफीने रंगत आणली. माजी विद्यार्थ्यांच्या ब्लॅक ड्रेस कोडमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. सजावटीसाठी उषा पवार यांनी रांगोळी काढली, तर प्रकाश गायकवाड यांनी त्यांना सहकार्य केले.
या सोहळ्यातून जाधव सरांच्या ३६ वर्षांच्या शैक्षणिक सेवेला माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेची भावपूर्ण सलामी दिली. “३० सप्टेंबर हा नोकरीतील शेवटचा दिवस असला, तरी ४ ऑक्टोबर हा शिक्षक-विद्यार्थी नात्याच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. शाळेच्या हजेरीपटावर सरांचे नाव नसले, तरी आमच्या मनाच्या पटावर ते कायमचे कोरलेले राहील,” या भावनेने उपस्थितांनी जाधव सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
‘माझी शाळा माजी विद्यार्थी परिवार’ यांच्या एकजुटीचे, सहकार्याचे आणि शिक्षकांप्रती असलेल्या कृतज्ञतेचे दर्शन घडविणारा हा सेवापूर्ती सत्कार सोहळा सर्वांसाठी एक अविस्मरणीय आठवण ठरला.
माझी शाळा माजी विद्यार्थी परिवार
अनुदत्त विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कांदिवली पूर्व





