भाजीपाल्यांचे दर कडाडले
भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य माणसाणे खायचे तरी काय?, असा प्रश्न पडला आहे. उन्हाचा तडाखा अन् अवकाळी पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे ताज्या उत्पादनांची टंचाई निर्माण झाली आहे. या कारणाने, बाजारभावात प्रचंड वाढ होत चालली आहे.
काही आठवड्यापुर्वी शंभर रुपये किलो भावाने विकल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर आता थेट २०० रुपयांवर पोहोचले आहेत. बदलत्या हवामानाचा पिकांवर गंभीर परिणाम झालाय. कडक उन्हामुळे भाजीपाल्याची नासाडीही भरपूर झाली आहे.
टोमॅटो, हिरवी मिरची आणि पालेभाज्या यांसारख्या भाज्या कापणीपूर्वीच कोमेजत चालल्याचं चित्र आहे. घाऊक बाजारात देखील फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने परराज्यातून फळभाज्यांची आवक करण्यात आली. परिणामी बहुतांश फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
त्यातच नवीन लागवड करण्यासाठी अजून तरी एक ते दीड महिन्याचा वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या फळभाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याचं म्हटलं जातंय. यामुळे सर्व सामान्य लोक खरेदी करताना आखडता हाथ घेत आहेत.
एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांमध्ये ५० टक्के घट झाली आहे. मुंबईच्या बाजारपेठेत दररोज ५० हजार टन भाजीपाल्याची आवश्यकता असते. उत्पादकता कमी झाल्यामुळे पुरवठा निम्म्यावर आला आहे. सध्या बाजारात २० रुपये प्रति २५० ग्रॅमच्या खाली कोणतीही भाजी उपलब्ध नाही.
‘
सध्या बाजारात कांदे ५० ते ६० रुपये किलोने विकले जात आहेत. तर, कोथिंबीर सर्वात महाग झाली आहे. कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर हे तब्बल ७० ते ८० रुपये झाले आहेत. भेंडी १२० ते १४० रुपये किलो, गवार १५० ते १६० रुपये किलो, फ्लाॅवर १०० ते १२० रुपये किलोने विकली जात आहेत. तसंच टोमॅटो ५० रुपये प्रति २५० ग्रॅम दराने विकले जात आहेत. यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला मोठी झळ बसली आहे.





