“पाणी,आरोग्य आणि पुनर्वसनाचा तिढा सोडवा!”; वॉर्ड ३८ मधील ज्वलंत प्रश्नांवर नगरसेविका सौ.सुरेखा परब लोके यांचे पालिका आयुक्तांना साकडे..!!


(प्रतिनिधी, मुंबई) : किसन राम गायकवाड

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ३८ मधील रखडलेले पाणी प्रश्न, आरोग्य सुविधा आणि प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाबाबत महानगरपालिका आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष देऊन सकारात्मक पावले उचलावीत, अशी विनंती स्थानिक नगरसेविका सौ. सुरेखा परब लोके यांनी एका पत्राद्वारे केली आहे. “प्रशासकीय स्तरावर या प्रश्नांची तातडीने सोडवणूक झाल्यास हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. वॉर्डात सध्या दोन दिवसाआड आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे. पाण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागून प्रतीक्षा करावी लागते. पाणीपुरवठा विभागामार्फत तांत्रिक त्रुटी दूर करून नियमित पाणी मिळावे, ही नागरिकांची रास्त मागणी त्यांनी आयुक्तांकडे मांडली आहे.

Advertisement

आप्पा पाडा येथे प्रसूतीगृहासाठी आरक्षित जागेवर इमारत तयार असतानाही तिथे केवळ ‘आरोग्य केंद्र’ चालवले जात आहे. या इमारतीत पूर्ण क्षमतेचे प्रसूतीगृह सुरू झाल्यास परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना हक्काची आरोग्य सुविधा मिळेल. याप्रकरणी आयुक्तांनी उच्चस्तरीय चौकशी करून प्रसूतीगृह कार्यान्वित करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. पोईसर नदी रुंदीकरण आणि अन्य विकासकामांतून बाधित होणाऱ्या शेकडो कुटुंबांना वॉर्डाबाहेर न पाठवता, वॉर्डातीलच PTC आणि PAP सदनिकांमध्ये प्राधान्याने सामावून घ्यावे. यामुळे प्रकल्पबाधितांचे सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य कायम राहील, असे सौ. लोके यांनी नमूद केले आहे. वन विभाग आणि महानगरपालिका यांच्यातील सीमा अनिश्चिततेमुळे अनेक विकासकामांत अडथळे येत आहेत. आयुक्तांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून हद्द निश्चितीसाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून भविष्यातील पेच टाळता येईल.

पालिका आयुक्त या संवेदनशील विषयांची गांभीर्याने दखल घेऊन वॉर्ड ३८ मधील नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x