“राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या”
राजर्षी शाहू महाराज यांची आज १५० वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त कोल्हापूरसह राज्यभरात आणि राजधानी नवी दिल्लीत देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याचं म्हटलं आहे. आज एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
“राजर्षी शाहू महाराजांच्या जन्माच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर कार्यक्रम करणार आहोत. महाराजांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणं, त्यांनी रयतेचं राज्य कोल्हापूरमध्ये कसं उभं केलं हे देशाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.”,असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
“शाहू महाराजांनी आयुष्यभर समाजसेवेचं काम केले आहे. विशेषत: समतेचा विचार जगभर पोहोचवण्यासाठी आपण कार्यरत राहूया, हीच राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल.”, असंही मुश्रीफ म्हणाले.
“राजर्षी शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्तानं मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना विनंती करतो की राजर्षी शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा.”, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केलीये.
हसन मुश्रीफ यांच्या या मागणीला महाविकास आघाडीकडूनही पाठिंबा मिळाला आहे. छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी कोणी करत असेल तर त्यात टीका करण्यासारखं काही नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.





