पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!!
ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती. सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांविषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन,अनिष्ट चालीरीती रूढी- परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क, प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला.

माणकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असून देखील ते विद्वान व दूरदर्शी गृहस्थ होते. अठराव्या शतकामध्ये आजच्या सारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी अहिल्येला शिक्षणाची घरीच व्यवस्था केली. अहिल्या मातेचे जीवन घडविण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता. अवघ्या आठ वर्षाची असतानाच होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकरांचा बारा वर्षाचा एकुलता एक शूरवीर मुलगा खंडेराव यांच्याशी अहिल्याचा विवाह २० मे १७३३ रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झाला.
लग्नानंतर लगेच आपल्या चतुर, क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली. त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली. दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी देखील पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे, वाचणे, गणित इत्यादी गोष्टी शिकवल्या. तसेच घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरवणे, युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे, लढाया करणे, पत्रव्यवहार करणे न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले. परिणामी अहिल्याबाईंची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली.
इ.स. १७५४ मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्याचा शूरवीर पती खंडेराव यांना वीरमरण आले. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी वैधव्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगामित्वाचा परिचय दिला. सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहिती असूनही सती जाणे तहकूब करण्यात अहिल्याबाईनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे. आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही कोण जाणे. परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्याबाईने प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला. धर्म, रूढी, परंपरा यापलीकडे कर्तव्य महत्त्वाचे माणून रयतेला कल्याणकारी राज्य दिले.
मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर २९ वर्षे अत्यंत यशस्वीपणे खऱ्या कल्याणकारी योजना काय असू शकतात आणि त्या कशा राबवल्या जाव्यात हे त्यांनी दाखवून दिले. सासरे मल्हाररावांचा मृत्यू २० मे १७६६, मुलगा मालेरावांचा मृत्यू २७ मार्च १७६७ मध्ये झाला. अशी एकामागून एक दुःखे येत असतानाही अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी, समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता ,समता व न्याय या तत्त्वाप्रमाणे राज्य केले.
मुत्सद्दी अहिल्या म्हणजे तळपती समशेर आणि लखलखती वीज होती. त्यांनी आपले आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केले. संपूर्ण भारतात अनेक विहिरी, तलाव, कुंड, घाट बांधले आहेत. रस्ते, पूल निर्माण केले आहेत. जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाते ते काम लोकमाता अहिल्याबाईंनी केलेे. उद्योगधंद्यांना व त्याच्या विकासाला प्राधान्य दिले. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदोर वरून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर, मजूर, विणकर, कलावंत, साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, पैसा, घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या. आजही महेश्वरी साड्या, पैठणी, धोतर प्रसिद्ध आहेत. राज्यात पशुपक्षी यांना चरण्यासाठी त्यांनी कुरणे राखली.
मुंग्यांना साखर, माश्यांना कणकेचा गोळा, उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पाणपोया, हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची सोय केली. आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली. दिव्यांग, अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे व सदावर्ते चालविली. वस्त्रांचे वाटप केले. प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आंबराई, बगीचे ,वृक्षारोपण विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा बांधल्या. घाट बांधतांना केवळ तज्ञांची मतं विचारात न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलून घाटाच्या पायऱ्या कशा हव्यात, कपडे धुताना बाळ कुठे ठेवायला सोयीस्कर पडेल, कपडे बदलताना खोल्या कुठे असाव्यात? इतक्या बारीक तपशिलासह घाट बांधून घेतले.
सर्वधर्मसमभावाचा आदर्श मिरवीत मंदिरे, मशिदी, दर्गे व विहार बांधली. तर काही मंदीरांचा जीर्णोद्धार केला. रस्ते व महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले. मजुरांना काम मिळाले व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण झाली. राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे या बहादुरा सोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जातीभेदाला तडा दिला. अहिल्याबाई ह्या समाजसुधारक होत्या. त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवताधर्म. प्रजेवर जास्त करांचा बोजा न लादता राज्याचा कोष समृद्ध केला. स्वतःचा खर्च मर्यादित करून खाजगी उत्पादनाचा उपयोग सुद्धा लोककल्याणासाठी केला. अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला व विचारांना “निर्भीड समाचार” तर्फे विनम्र अभिवादन….!





