एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला..!!
केंद्र सरकारने सर्व सामान्य ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती मध्ये वाढ करण्याची घोषणा करून मोठा झटका दिला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोमवारी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये ५० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. हा निर्णय सर्व ग्राहकांसाठी लागू असणार आहे, असे ते म्हणाले.
याशिवाय ज्या लोकांना उज्ज्वला योजने अंतर्गत याचा लाभ मिळत आहे त्यांना देखील हा नियम लागू असणार आहे. उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ५५० रुपये आणि सामान्य ग्राहकांना ८५३ रुपये दयावे लागतील. यापूर्वी ही किंमत ५०० आणि ८०३ रुपये होती.
केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले की दोन ते तीन आठवड्यांनी याचे पुनरावलोकन करण्यात येईल. उत्पादन शुल्कात केलेली वाढ सामान्य ग्राहकांना लागू केली जाणार नाही. यामागील मुख्य उद्देश हा तेल कंपन्यांना झालेला तोटा भरून काढणे आहे. या दर वाढीमुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे.





