जालन्यात प्रेमसंबंधाच्या संशयातून १८ वर्षीय तरुणाची हत्या!


मुंबई/जालना: निर्भीड समाचार वृत्तसेवा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील रुई गावात प्रेमसंबंधाच्या संशयातून एका १८ वर्षीय तरुणाची अतिशय क्रूरपणे कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण जालना जिल्हा हादरला असून रुई गावावर भीतीचे सावट पसरले आहे. मृत तरुणाचे नाव राजेश विष्णू कोरकाने (वय १८ वर्षे, रा. रुई, ता. अंबड) असे आहे. या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गावातीलच चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन मुख्य संशयितांना तातडीने ताब्यात घेतले आहे.

घटनेची पार्श्वभूमी आणि जुना वाद
मयत राजेश कोरकाने हा रुई गावातील एका शेतकरी कुटुंबातील तरुण होता. गावातीलच एका मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींच्या मनात होता. या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात धुसफूस सुरू होती. मंगळवारी (१२ मे) दुपारी १२ वाजेच्या सुमारास याच कारणावरून राजेश आणि आरोपींमध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी गावातील नागरिकांनी आणि राजेशच्या चुलतीने मध्यस्थी करून वाद मिटवला होता. परंतु, आरोपींच्या मनात यावरून तीव्र राग होता. आरोपी दत्ता शेषराव साळे याने “तुला एक-दोन दिवसांत पाहून घेतो,” अशी धमकी राजेशला दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.

कट रचून पाठलाग करत जुन्या वाड्यात गाठले
सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास राजेश गावातील एका भागात उभा असताना आरोपींनी पूर्ववैमनस्यातून आणि ठरवलेल्या कटानुसार त्याला घेरले. तिथे त्यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक उडाली. आरोपींचा आक्रमक अवतार पाहून राजेश स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गावातील एका जुन्या, पडीक वाड्याच्या दिशेने पळाला. मात्र, हातात तीक्ष्ण हत्यारे घेऊन आलेल्या आरोपींनी त्याचा थरारक पाठलाग केला आणि त्या पडीक जागेवर त्याला गाठले.

अंगावर काटा आणणारा हल्ला: चेहरा, गळा, छातीवर वार
आरोपींनी राजेशला गाठल्यानंतर त्याच्यावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने अत्यंत निर्घृणपणे सपासप वार करण्यास सुरुवात केली. आरोपींनी रागाच्या भरात राजेशच्या चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर आणि दोन्ही हातांवर सपासप प्राणघातक वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, राजेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि गंभीर जखमांमुळे त्याचा घटनास्थळावरच जागीच मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. भरदिवसा घडलेल्या या थरारनाट्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

Advertisement

चौघांविरोधात गुन्हा दाखल; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या घटनेनंतर मयत राजेशच्या नातेवाईक काशीबाई पंढरीनाथ कोरकाने यांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा क्रमांक ९३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

दत्ता शेषराव साळे (रा. रुई)
शुभम दत्ता साळे (रा. रुई)
करण दत्ता साळे (रा. रुई)
अभिषेक उर्फ मोन्या अशोक मुसळे (रा. रुई)

घटनेचे गांभीर्य ओळखून तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) वैशाली पवार आणि महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या तासाभरात दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा; पोलीस बंदोबस्तात वाढ
हत्त्येची माहिती मिळताच अंबड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीएसपी) यांनीही रुई गावाला भेट देऊन पाहणी केली. घटनेच्या तपासाला गती देण्यासाठी फॉरेन्सिक टीम (न्यायवैद्यक प्रयोगशाळा) आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे भौतिक पुरावे गोळा केले आहेत. राजेशचा मृतदेह शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यासाठी सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. हत्येच्या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांचा संताप आणि गावातील तणाव पाहता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुई गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पाच बहिणींचा एकुलता एक ‘नवसाचा भाऊ’ हरपला
या घटनेमुळे कोरकाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत राजेश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला पाच मोठ्या बहिणी असून, अनेक नवस-सायास केल्यानंतर जन्माला आलेला तो घरातील सर्वात लहान आणि लाडका भाऊ होता. पाचही बहिणींच्या गळ्यातील ताईत असलेला एकुलता एक भाऊ अशा प्रकारे क्रूरतेचा बळी ठरल्याने संपूर्ण गावात अत्यंत शोकाकुल वातावरण असून हळहळ व्यक्त केली जात आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x