बिहारची ‘हंटरवाली’ निवृत्त; IPS शोभा ओहटकर यांचं पोलीस पर्व संपलं!


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

आपल्या कडक शिस्तीसाठी आणि गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडण्यासाठी संपूर्ण बिहार आणि पोलीस दलात प्रसिद्ध असलेल्या वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी शोभा ओहटकर अखेर त्यांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी पोलीस सेवेतून ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांनी बिहार पोलीस दलात महानिदेशक (DG – होमगार्ड आणि अग्निशमन सेवा) या सर्वोच्च पदावरून निवृत्ती घेतली. त्यांच्या निवृत्तीमुळे बिहारमधील एका धडाकेबाज आणि शिस्तप्रिय पोलीस पर्वाचा समारोप झाला आहे. निवृत्तीच्या वेळी आयोजित विशेष निरोप समारंभात सहकारी आणि जवानांचे आभार मानताना त्या अत्यंत भावुक झाल्या होत्या.

अवघ्या २२ व्या वर्षी IPS; बिहारमधील ‘हंटरवाली’ अशी ओळखमूळच्या मराठी असलेल्या शोभा ओहटकर यांची १९९० च्या बॅचमधून बिहार कॅडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी देशातील अत्यंत कठीण समजली जाणारी ‘युपीएससी’ (UPSC) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली.

१९९० च्या दशकात बिहारमध्ये गुन्हेगारी कमालीची वाढली होती. अपहरण, दरोडे आणि खंडणीखोरांनी उच्छाद मांडला होता. अशा अत्यंत आव्हानात्मक काळात १९९२ मध्ये त्यांनी पाटणा शहराच्या ‘सिटी एएसपी’ (ASP) म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आपल्या पहिल्याच पोस्टिंगपासून गुन्हेगारांविरुद्ध थेट युद्ध पुकारले. दरभंगा येथे एसपी असताना त्यांनी गुंड आणि टवाळखोरांवर अशी काही जरब बसवली की, गुन्हेगार त्यांचे नाव ऐकूनच थरथर कापायचे. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे आणि कडक शिस्तीमुळे संपूर्ण बिहारमध्ये त्यांना ‘हंटरवाली मॅडम’ आणि ‘लेडी सिंगम’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

Advertisement

विविध जिल्ह्यांत गुन्हेगारांचा थरकाप आणि जनतेचा विश्वासआपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत शोभा ओहटकर यांनी पाटणा, दरभंगा, हजारीबाग, छपरा, वैशाली आणि देवघर यांसारख्या बिहार आणि तत्कालीन झारखंडमधील अतिसंवेदनशील जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक (SP) म्हणून काम पाहिले. ज्या ज्या जिल्ह्यात त्यांची बदली व्हायची, तिथले माफिया आणि गुन्हेगार आपले तळ सोडून पळून जायचे.

त्यांनी केवळ गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले नाही, तर पोलीस दलाची प्रतिमा सुधारून सर्वसामान्य जनतेचा विश्वास जिंकला. महिला सुरक्षेच्या बाबतीत त्यांनी घेतलेले कडक निर्णय आणि केलेली कारवाई बिहारच्या पोलीस इतिहासात मैलाचा दगड ठरली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना २००७ मध्ये ‘पोलीस पदक’ (Police Medal for Meritorious Service) देऊन सन्मानित करण्यात आले होते.

बिहारच्या इतिहासातील पहिल्या महिला ‘महानिदेशक’ (DG)
शोभा ओहटकर यांच्या नावावर अनेक ऐतिहासिक विक्रमांची नोंद आहे. त्या बिहार पोलीस दलाच्या इतिहासातील पहिल्या महिला महानिदेशक (Director General – DG) बनल्या. केंद्रीय प्रतिनियुक्तीवर (Central Deputation) कार्यरत असताना त्यांनी ‘एअर इंडिया’मध्ये (Air India) कार्यकारी संचालक (सुरक्षा) Executive Director – Security म्हणून ५ वर्षे जबाबदारी सांभाळली, तसेच महाराष्ट्रातही त्यांनी ७ वर्षे सेवा दिली.

शेवटच्या काळात त्यांनी बिहार होमगार्ड आणि अग्निशमन सेवेच्या महासमादेष्टा (Commandant General) आणि महासंचालक पदाची धुरा अत्यंत कार्यक्षमतेने सांभाळली. त्यांच्या निवृत्तीनंतर सोशल मीडियावर आणि बिहारच्या जनतेकडून त्यांच्या धाडसी कारकिर्दीला मानाचा मुजरा केला जात असून, पुढील आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x