राज ठाकरेंवर हक्कभंग? राम कदमांचा मोठा इशारा!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर अत्यंत तीव्र शब्दांत आगपाखड केली आहे. राज्यातील चालू घडामोडींवर टीका करताना राज ठाकरेंनी वापरलेल्या एका वादग्रस्त शब्दामुळे आता नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी राज ठाकरेंच्या या विधानाचा खरपूस समाचार घेत, त्यांच्यावर विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव येऊ शकतो, असा जाहीर इशारा दिला आहे. यामुळे मनसे आणि भाजप आमनेसामने येण्याची चिन्हे असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राज ठाकरेंची नेमकी टीका काय होती?
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत झालेल्या सत्तांतरांवर आणि पक्षांतरांवर बोलताना राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. “महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ते अतिशय घाणेरडे आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकल्या जाणाऱ्यांचा आहे. हे जर देहविक्रीला तयार असतील, तर बाजारात गिऱ्हाईक तयार आहेतच,” असे खळबळजनक विधान राज ठाकरेंनी केले होते. लोकप्रतिनिधींच्या पक्षांतराची तुलना थेट देहविक्रीशी केल्यामुळे राजकीय वर्तुळातून यावर तीव्र पडसाद उमटत आहेत.
राम कदम यांचा हक्कभंगाचा इशारा
राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी आक्षेप घेतला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राम कदम म्हणाले, “राज ठाकरे यांचे हे विधान लोकप्रतिनिधींच्या आणि विशेषाधिकाराचे हनन करणारे आहे. २०-२० लाख जनतेमधून निवडून येणारे लोकप्रतिनिधी जेव्हा निर्णय घेतात, तेव्हा त्यामागे काहीतरी कारणे असतात. राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे लोकप्रतिनिधींचा अवमान झाला असून, त्यांच्या या विधानावर विधिमंडळात कुणीही हक्कभंग प्रस्ताव आणू शकतो. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “माझ्या मनात राज ठाकरे यांच्याबद्दल वैयक्तिक आदर आहे, त्यामुळे मी स्वतः त्यांच्याविरोधात हक्कभंग टाकणार नाही; मात्र त्यांचे विधान कायदेशीरदृष्ट्या हक्कभंगाच्या कक्षेत येणारे आहे.
जनतेचा कौल आणि बंडाचे समर्थनआमदार राम कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडाचे आणि त्यानंतरच्या घडामोडींचे समर्थन केले. “कोणता कॅबिनेट मंत्री स्वतःहून सोडून गेला आहे का? एकनाथ शिंदेंसोबत जे आमदार गेले होते, ते पुन्हा जनतेमधून निवडून आले आहेत. जर लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल रोष किंवा राग असता, तर जनतेने त्यांना निवडणुकीत पाडले असते. नुकत्याच झालेल्या खासदारकीच्या निवडणुकांमध्येही जनतेने त्यांना स्वीकारले आहे, मग त्यांच्या अपयशाचा दर कुणी दाखवू शकेल का?” असा सवाल त्यांनी राज ठाकरेंना केला.
तसेच, भूतकाळातील दाखला देत राम कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा छळ केला म्हणूनच त्यांनी पूर्वी शिवसेना सोडली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.
फोडाफोडीचे राजकारण आणि भविष्यातील ठिणगी
राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमधील फोडाफोडीवर बोट ठेवले असताना, भाजपच्या वतीने राम कदम यांनी दिलेला हा इशारा मनसेला बॅकफूटवर आणण्याचा प्रयत्न मानला जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. राज ठाकरेंच्या या एका विधानामुळे आता मनसे विरुद्ध महायुती असा नवा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या चालू किंवा आगामी अधिवेशनात खरोखरच राज ठाकरेंविरोधात हक्कभंग आणला जातो का, की हा केवळ राजकीय इशारा ठरतो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.





