पालिका रुग्णालयात पाच तास डॉक्टर न फिरकल्याने महिलेचा मृत्यू ..!!
कल्याण : कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी येथे राहणाऱ्या सविता गोविंद बिराजदार (४३) यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना कल्याणमधील पालिकेच्या रुक्मिणीबाई दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना कळवा येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. त्यासाठी नातेवाईकांनी पालिका आणि खासगी रुग्णवाहिका मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यांना ती मिळाली नाही. तब्बल चार तासानंतर एक रुग्णवाहिका मिळाली पण ती देखील दुसऱ्या रुग्णाला घेऊन जाणार असल्याचे समजले.
हतबल झालेल्या नातेवाईकांनी उपचार होतील या आशेवर सदर महिलेला पालिकेच्या रुक्मिणीबाई या रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र पाच तास उलटूनही डॉक्टर आलेच नाहीत. त्यामुळे उपचाराअभावी सविता बिराजदार या महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेबाबत रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णवाहिकेबाबत दोन्ही मुलांचा काहीच निर्णय होत नव्हता. त्यात वेळ निघून गेली. तरीही नातेवाईकांनी केलेल्या आरोपांबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.




