पिंपरीतील सहायक आयुक्त “तिसऱ्या” अपत्यामुळे सेवेतून बडतर्फ..!!
सरकारी आदेशाचे उल्लंघन करून लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ करण्याचा आरोप आणि विभागीय चौकशीत तीन अपत्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पिंपरी महापालिकेचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ही कारवाई केली आहे. श्रीनिवास दांगट यांच्या निवृत्तीला अवघ्या दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असताना ही कारवाई करण्यात आली.
महापालिका सेवेत दांगट हे लिपिक म्हणून रुजू झाले होते. महापालिका आस्थापनेवरील प्रशासन अधिकारी अभिनामाची २९ जुलै २०१३ रोजी सरळसेवेची रिक्त पदे भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरतीच्या अटी व शर्थीच्या अधीन राहून दांगट यांची महापालिका आस्थापनेवरील प्रशासन अधिकारी गट ब या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
सरकारी नियमानुसार प्रशासन अधिकारी होताना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक होते. याबाबत त्यांना वेळोवेळी कळवूनही त्यांनी त्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. दांगट यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाल्या नंतर त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांना तीन अपत्ये असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आयुक्तांनी त्यांना महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. श्रीनिवास दांगट यांचा सेवा कालावधी हा २८ फेब्रुवारी २०२५ ला संपणार होता. निवृत्तीला अवघा दीड महिना शिल्लक असताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईच्या विरोधात दांगट हे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.





