‘सेन्स नॉट बोर्ड’ (सेन्सॉर बोर्ड) बरखास्त करा…संतप्त आंदोलकांची मागणी..!!


मुंबई : विजय उत्तमबाई कांबळे

‘ चल हल्ला बोल ‘ या मराठी चित्रपटातील महाकवी नामदेव ढसाळ यांची, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो…!! ही कविता काढा. तसेच कोण नामदेव ढसाळ? असा उर्मट सवाल करणाऱ्या सेन्स नॉट बोर्ड (सेन्सॉर बोर्ड) विरोधातच आता ‘चल हल्ला बोल’ असा थेट इशारा विविध जनसंघटना आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.

सोमवार 3 मार्च रोजी लोकांचा सिनेमा चळवळ, दलित पँथर, लोकांचे दोस्त, कष्टकरी शेतकरी संघटना, चर्मकार समाज, मातंग प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, युवा भारत संघटना, भारतीय महिला फेडरेशन आदी संघटनांनी दादर (पूर्व) स्थानकाबाहेर निदर्शने केली. यावेळी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

लोकांचा सिनेमा चळवळीच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी लोक वर्गणीतून ‘चल हल्ला बोल’ हा सिनेमा बनवला आहे. दलित पँथर, युक्रांद या चळवळींच्या पार्श्वभूमीवर दलित, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्यांक, मुस्लिम, शेतकरी, स्त्रिया आदींच्या शोषणाविरुद्ध लढ्याची भूमिका मांडणारा हा चित्रपट आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी नाकारली आहे. सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी बोर्डाने तब्बल अकरा कट सांगितले आहेत. याबाबत बोलताना महेश बनसोडे म्हणाले की, बोर्डाने नामदेव ढसाळ यांची कविता काढा असे लेखी कळवले आहे. याबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारला असता त्यांनी, कोण नामदेव ढसाळ ? आम्ही ओळखत नाही असा उर्मट सवाल केला. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Advertisement

सेन्सॉर बोर्ड जाणून बुजून बहुजन संस्कृती आणि अभिव्यक्तीवर बंदी आणत असल्यामुळे सेन्सॉर बोर्ड विरोधात मोहीम सुरू केल्याचे लोकांचे दोस्त संघटनेचे रवि भिलाणे यांनी स्पष्ट केले. यावेळी सुप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत, डॉ. स्वप्नील ढसाळ, संगीता ढसाळ, पँथर सुमेध जाधव, कॉमेड सुबोध मोरे, ज्योती बडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे, कष्टकऱ्यांचे नेते विठ्ठलभाऊ लाड, काँग्रेसचे युवराज मोहिते, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे, युवा भारत संघटनेचे संजय कुंभार, विजय कांबळे आदी उपस्थित होते. विविध मान्यवरांनीही या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. लोकांचा सिनेमा चळवळीच्या माध्यमातून, सेन्सॉर बोर्डची गरज काय? असा प्रश्न विचारला जात आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x