दिल्लीत चालत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार; २ अटक!
मुंबई/दिल्ली: निर्भीड समाचार वृत्तसेवा
देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा एका निर्घृण आणि संतापजनक कृत्याने हादरली असून, एका चालत्या खाजगी स्लीपर बसमध्ये ३० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार (Gang-Rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील राणी बाग आणि नांगलोई परिसरात घडलेल्या या खळबळजनक प्रकरणात, पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर जलद कारवाई करत खाजगी स्लीपर बसचा चालक उमेश आणि वाहक रामेंद्र या दोघांना अटक केली आहे. पीडित महिला कारखान्यातून घरी परतत असताना वेळ विचारण्याच्या बहाण्याने तिला रॉयल ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बळजबरीने ओढण्यात आले आणि दोन तास चालत्या बसमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली बस जप्त केली असून, आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेळ विचारण्याच्या बहाण्याने कृत्य
पीडित महिला दिल्लीतील मंगोलपुरी येथील एका कारखान्यात काम करते. रात्री काम संपवून ती आपल्या घरी पायी परतत होती. वायव्य दिल्लीतील सरस्वती विहार येथील बी-ब्लॉक बस स्टँडजवळ ती पोहोचली असता, तिथे एक खाजगी स्लीपर बस उभी होती.महिलेने बसच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीला फक्त वेळ (Time) विचारला. वेळ विचारत असतानाच आरोपीने तिला बळजबरीने ओढून बसच्या आत खेचले. त्यानंतर आरोपींनी बस चालू केली आणि रात्रीच्या अंधारात ती दिल्लीच्या रस्त्यांवर धावू लागली.
चालत्या बसमध्ये दोन तास अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बस राणी बाग परिसरातून नांगलोईच्या देशाने नेली. या ७ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान बस चालवत असताना आणि ती थांबलेली असताना, ड्रायव्हर उमेश आणि कंडक्टर रामेंद्र या दोघांनी मिळून महिलेवर चालत्या बसमध्ये तब्बल दोन तास सामूहिक बलात्कार केला.या दरम्यान बसच्या खिडक्यांना गडद रंगाचे पडदे लावलेले असल्याने बाहेरील कोणालाही आत काय चालले आहे याचा सुगावा लागला नाही. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला मध्यरात्री २ च्या सुमारास नांगलोई मेट्रो स्टेशनजवळ रस्त्यावर फेकून दिले आणि तिथून पळ काढला.
पीडितेची गरिबी आणि हृदयद्रावक परिस्थिती
पीडित महिला अत्यंत गरीब असून ती पिंपटपुरा येथील एका झोपडपट्टीत आपल्या कुटुंबासह राहते. तिला तीन लहान मुली आहेत आणि तिचा पती क्षयरोगाने (TB) ग्रस्त आहे.घटनेनंतर जेव्हा पोलिसांनी तिची गंभीर अवस्था पाहून तिला रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले, तेव्हा तिने नकार दिला. “घरी माझ्या तीन लहान मुली आहेत आणि पती आजारी आहे, मी रुग्णालयात राहिले तर त्यांच्यासाठी जेवण कोण बनवणार?” असे हृदयद्रावक उत्तर तिने पोलिसांना दिले. मात्र, पोलिसांनी तिची समजूत काढून तिला बाबा साहेब आंबेडकर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले, जिथे तिच्यावर अत्याचार झाल्याची पुष्टी झाली.
पोलिसांची कारवाई आणि आरोपींना अटक
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवले. राणी बाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४(१) (बलात्कार), ७०(१) (सामूहिक बलात्कार) आणि ३(५) (समान हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी अवघ्या काही तासांतच माग काढून चालक उमेश आणि वाहक रामेंद्र या दोन्ही आरोपींना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली बिहार पासिंगची ‘रॉयल ट्रॅव्हल्स अँड कार्गो’ची बस जप्त करण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीमने बसमधून अनेक वैज्ञानिक पुरावे गोळा केले आहेत.
राजकीय वाद आणि ‘निर्भया’ प्रकरणाची पुनरावृत्ती
या घटनेनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आम आदमी पक्षाचे (AAP) नेते सौरभ भारद्वाज यांनी केंद्र सरकार आणि दिल्लीच्या नायब राज्यपालांवर (LG) जोरदार निशाना साधला. दिल्लीत २०१२ च्या ‘निर्भया’ प्रकरणासारखीच पुनरावृत्ती झाली असून, चालत्या बसमध्ये दोन तास महिला ओरडत असताना दिल्ली पोलीस काय करत होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दिल्ली पोलीस आयुक्तांकडून सात दिवसांत सविस्तर अहवाल मागवला आहे.





