प्रियकरासाठी मुलगी बनली ‘विलेन’; करोडपती वडिलांच्या घरातच टाकला दरोडा!
मुंबई/मुरादाबाद: निर्भीड समाचार वृत्तसेवा
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील नागफनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका करोडपती पितळ (ब्रास) आणि प्रॉपर्टी व्यावसायिकाच्या घरावर पडलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या (₹१.२० कोटी) दरोड्याचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. या संपूर्ण गुन्ह्याची मास्टरमाइंड दुसरी कोणी नसून व्यावसायिकाची स्वतःची मुलगी अरीबा निघाली आहे. तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून स्वतःच्याच घरात एवढा मोठा दरोडा घडवून आणला. याप्रकरणी पोलिसांनी अरीबा आणि अर्शदसह रवी कुमार, निक्की सिंह आणि कुलदीप सिंह अशा एकूण ५ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी कारवाई करत आरोपींकडून ₹४७.२४ लाख रोख, ४ गावठी कट्टे, ५ मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेल्या २ कार जप्त केल्या असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
लक्झरी लाईफ आणि आंतरजातीय प्रेमातून रचला कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकबर कंपाऊंडमध्ये राहणारे मोहम्मद इम्रान हे मुरादाबादमधील मोठे पितळ व्यावसायिक आहेत, तसेच त्यांचा प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचाही मोठा व्यवसाय आहे. त्यांची मुलगी अरीबा ही अमरोहा येथील राहणाऱ्या अर्शद वारसी नावाच्या युवकाच्या प्रेमात गेल्या ७ ते ८ वर्षांपासून वेडी होती.दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने अरीबाच्या कुटुंबाचा या विवाहाला तीव्र विरोध होता. कुटुंबीय लग्नाला परवानगी देत नाहीत आणि घर सोडून पळून जाण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, हे पाहून अरीबा आणि अर्शदने गुन्हेगारीचा मार्ग निवडला. आलिशान आयुष्य जगणे आणि घरातून पळून जाऊन लग्न करून नवीन आयुष्य सुरू करणे, या उद्देशाने अरीबाने स्वतःच्याच घरावर दरोडा टाकण्याचा कट रचला.
एक महिना आधीच दिली होती घराची चावी
वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) सतपाल अंतिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा अत्यंत पद्धतशीरपणे आणि नियोजनबद्ध रीतीने करण्यात आला होता. अरीबाने सुमारे एक महिना आधीच आपल्या घराच्या मुख्य गेटची एक बनावट चावी तयार करून तिचा प्रियकर अर्शदकडे सोपवली होती.व्यावसायिक इम्रान यांना जिगर कॉलनीतील एका नवीन मालमत्तेची खरेदी आणि नोंदणी (Registry) करायची होती. त्यासाठी त्यांनी आपले नातेवाईक आणि बिझनेस पार्टनर यांच्याकडून गोळा करून सुमारे १.२० कोटी रुपयांची रोख रक्कम घरात आणून ठेवली होती. ही सर्व माहिती अरीबाने अर्शदला दिली आणि दरोड्यासाठी ११ मे ची रात्र निश्चित केली. विशेष म्हणजे, याच दिवशी तिचा वाढदिवसही होता.
रात्री ४ वाजता डिजिटल लॉक उघडले आणि भावावर कट्टा रोखला
११ मे रोजी पहाटे ४ च्या सुमारास अर्शद हा आपल्या पाच ते सहा साथीदारांसह दोन कारमधून इम्रान यांच्या घराजवळ पोहोचला. अरीबाने दिलेल्या बनावट चावीने त्यांनी मुख्य गेट उघडले. घरात प्रवेश केल्यानंतर, दरोडेखोरांना अडथळा येऊ नये म्हणून अरीबाने आतूनच घराचे मुख्य डिजिटल लॉक (Buzzer) बटण दाबून उघडून दिले.दरोडेखोरांनी घरात प्रवेश करताच अरीबाचा भाऊ अरीब याच्या कपाळावर थेट पिस्तुल (तमंचा) रोखले. संपूर्ण कुटुंबाला ओलीस ठेवून कपाटात ठेवलेले १ कोटी २० लाख रुपये रोख आणि ६ तोळे सोन्याचे दागिने अवघ्या काही मिनिटांत लुटले आणि तेथून पळ काढला. दरोडा पडल्यानंतर संपूर्ण मुरादाबाद शहरात खळबळ उडाली होती.
पोलिसांना असा आला मुलीवर संशय
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने ४ पथके तयार करून तपास सुरू केला. घराच्या मुख्य दरवाजाचे डिजिटल लॉक बाहेरून तोडल्याचे कोणतेही चिन्ह नव्हते, त्यामुळे पोलिसांना सुरुवातीलाच घरातील कोणाचा तरी हात असल्याचा संशय आला. पोलिसांनी घरातील सर्व सदस्यांचे कॉल डिटेल्स (CDR) आणि मोबाईल लोकेशन तपासण्यास सुरुवात केली.या तपासणीदरम्यान अरीबाच्या मोबाईलवरून अमरोहा येथील अर्शद नावाच्या तरुणाशी सतत संभाषण होत असल्याचे उघड झाले. दरोड्याच्या रात्री आणि अगदी दरोडा सुरू असतानाही त्यांच्यात संपर्क झाल्याचे तांत्रिक पुराव्यांवरून सिद्ध झाले. पोलिसांनी अरीबाला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली असता, तिने आपला गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण सत्य बाहेर आले.
५ आरोपी गजाआड; उर्वरित साथीदारांचा शोध सुरू
मुरादाबाद पोलिसांनी अरीबा आणि तिचा प्रियकर अर्शद वारसी यांच्यासह दरोड्यात थेट सामील असलेल्या कुलदीप, रवी आणि निक्की यांना अटक केली आहे. आरोपींकडून लुटलेल्या रकमेपैकी ४७ लाख २४ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे आणि दोन्ही कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या टोळीतील उर्वरित ३ ते ४ आरोपी अजूनही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेण्यासाठी छापेमारी करत आहेत.आपल्याच मुलीने प्रियकराच्या नादात संपूर्ण कुटुंबाचा विश्वासघात केल्याने व्यावसायिक मोहम्मद इम्रान यांचे कुटुंब प्रचंड धक्क्यात आहे. या घटनेमुळे मुरादाबादमध्ये ‘घरचा भेदी’ कसा घात करू शकतो, याचीच चर्चा रंगली आहे.





