राज ठाकरेंची शरद पवारांवर जहरी टीका
ठाणे : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के (धनुष्यबाण) आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे (धनुष्यबाण) यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची कळवा येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे (मशाल) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (तुतारी) शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवार यांनी सुरुवात केली असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या या आरोपामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
राज ठाकरे यांनी अत्यंत कडक शब्दात शरद पवारांना टोमणा मारला आहे. “काय ढेकणा संगे हिराही भंगला. बरोबर शरद पवार बसले आहेत. शरद पवारांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली. १९७७-७८ सालची गोष्ट असेल, पुलोदचं सरकार स्थापन झालं. महाराष्ट्रात पहिल्यांदा अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण करण्यास शरद पवार यांनी सुरुवात केली आहे.
१९९१ साली याच शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. त्यावेळेला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम देखील शरद पवारांनी केलं होतं”, असा घणाघात राज ठाकरेंनी केला आहे.




