अंगणात जे जिंकू शकले नाही, त्यांनी मोदींच्या उठाठेवी करू नये: भातखळकर
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
पुण्यात मनसे विद्यार्थी सेनेच्या दौऱ्यादरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या केबिनमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी पंतप्रधानांचा फोटो लावण्यास आक्षेप घेत अमित ठाकरेंनी ही कृती केली होती. या प्रकारानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून भाजपचे मुंबईतील धडाकेबाज आमदार अतुल भातखळकर यांनी अमित ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वावरच बोट ठेवत जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे विद्यार्थ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालयात गेले होते. प्राचार्यांच्या दालनात चर्चा करत असताना, तिथल्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंच्या अगदी शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.यावर तीव्र आक्षेप घेत, “शिवरायांच्या आणि बाबासाहेबांच्या बरोबरीने पंतप्रधानांचा फोटो कशाला?” असा सवाल करत अमित ठाकरेंनी तो फोटो तात्काळ तिथून काढायला लावला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून पुण्यातील स्थानिक प्रशासनाने अमित ठाकरेंविरोधात शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे.
अमित ठाकरेंच्या या भूमिकेनंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांसमोर येत अमित ठाकरेंचा समाचार घेतला. अमित ठाकरेंनी नुकतीच माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, जी मनसेचा बालेकिल्ला आणि ठाकरे कुटुंबाचे ‘घराचे अंगण’ मानले जाते. या निवडणुकीत अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.याचाच संदर्भ देत भातखळकर म्हणाले, “ज्यांना स्वतःच्या घराच्या अंगणात असलेल्या मतदारसंघातून साधे निवडून येता आले नाही, त्यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात अशा फालतू उठाठेवी करू नयेत. पंतप्रधान हे देशाचे घटनात्मक पद आहे आणि त्यांचा आदर राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ रील बनवण्यासाठी किंवा सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांचा आणि पंतप्रधानांचा अशा प्रकारे अपमान करणे योग्य नाही.
दुसरीकडे, गुन्हा दाखल झाल्यानंतरही अमित ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत भाजपला उत्तर दिले आहे. “माझ्यावर दाखल झालेला पहिला गुन्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी होता आणि आज दाखल झालेला हा दुसरा गुन्हा देखील शिवराय आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदरासाठीच आहे. अशा शेकडो केसेस अंगावर घेण्याची माझी तयारी आहे आणि या दोन्ही गुन्ह्यांचा मला अत्यंत सार्थ अभिमान आहे,” असे अमित ठाकरे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा आणि त्यानंतरच्या काळात अनेकदा महायुतीला आणि भाजपला अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. मात्र, पुण्यात अमित ठाकरेंच्या माध्यमातून झालेल्या या थेट संघर्षाने भाजप आणि मनसेमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. आगामी पालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि मनसे नेत्यांमधील हा ‘कलगीतुरा’ अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.





