१५ रु.च्या टेपने अडकला! पुण्यात हडपसरमधील बॉम्ब प्रकरणाचा खुलासा!
मुंबई/पुणे: निर्भीड समाचार वृत्तसेवा
पुण्याच्या हडपसर परिसरातील एका खाजगी रुग्णालयात ‘टायमर बॉम्ब’सदृश वस्तू ठेवून संपूर्ण शहरात खळबळ माजवून देणाऱ्या आरोपीला अखेर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. शिवाजी राठोड (वय ३०, मूळ रा. सोलापूर) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा कोणताही दहशतवादी कट नसून, स्वतःच्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चासाठी रुग्णालयाकडून तब्बल ७ लाख रुपयांची खंडणी उकळण्याच्या उद्देशाने रचलेला हा एक धक्कादायक डाव होता, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
यूट्यूब पाहून बनवला ‘डम्मी बॉम्ब’
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी राठोड आर्थिक विवंचनेत होता आणि त्याला एका गंभीर आजारावरील उपचारासाठी सुमारे ७ लाख रुपयांची अत्यंत गरज होती. १० मेला तो हडपसरमधील उषाकिरण रुग्णालयात उपचारासाठी गेला असता, डॉक्टरांनी त्याला खर्चाचा अंदाज दिला होता. एवढे पैसे नसल्याने त्याने रुग्णालयालाच धमकावून पैसे उकळण्याचा कट रचला.
गुन्ह्याची पद्धत शिकण्यासाठी त्याने यूट्यूबवर (YouTube) अनेक व्हिडिओ पाहिले. त्यानंतर त्याने केवळ ४०० रुपयांच्या खर्चात एक ‘डम्मी बॉम्ब’ तयार केला. यामध्ये त्याने ऑनलाईनवरून मागवलेले १६० रुपयांचे डिजिटल घड्याळ (टायमर), चार प्लास्टिकचे पाईप, काही वायर्स आणि टेपचा वापर केला होता. या वस्तूमध्ये प्रत्यक्षात कोणतेही स्फोटक नव्हते, मात्र ती हुबेहूब जिवंत टाईम बॉम्बसारखी दिसत होती.
ओळख लपवण्यासाठी दाढी केली अन् कपडे बदलले
बुधवारी संध्याकाळी शिवाजीने ही संशयास्पद वस्तू रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील पुरुषांच्या स्वच्छतागृहात ठेवली, ज्यावर ७ तासांचा टायमर सुरू होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) आपली ओळख पटू नये म्हणून त्याने अत्यंत हुशारीने नियोजन केले होते. रुग्णालयात जाताना त्याच्या चेहऱ्यावर दाट दाढी आणि मिशा होत्या, तसेच त्याने विशिष्ट कपडे परिधान केले होते.
रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्यानंतर तो थेट त्याच्या दुकानाच्या शेजारील सलूनमध्ये गेला. तिथे त्याने आपली पूर्ण दाढी आणि मिशा कट केल्या, हेअरस्टाईल बदलली आणि नवीन कपडे परिधान केले. धक्कादायक म्हणजे सलून चालकाला “माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, नंतर देतो” असे सांगून तो तिथून पसार झाला. या वेषांतरामुळे पोलिसांना सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेजवरून त्याचा माग काढणे कठीण जात होते.
१५ रुपयांच्या ‘ऑनलाईन पेमेंट’ने गेम उलटवला
शिवाजीने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण बॉम्ब बनवताना केलेल्या एका छोट्या चुकीमुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडला. डम्मी बॉम्ब असेंबल करत असताना त्याला पाईप जोडण्यासाठी लागणारा चिकटपट्टीचा (Adhesive Tape) रोल संपला. त्यामुळे तो घाईघाईत जवळच्या एका मोबाईल आणि जनरल स्टोअरमध्ये गेला.
तिथून त्याने १५ रुपये किमतीचा ‘टू-वे टेप’ खरेदी केला. त्याच्याकडे रोख पैसे नसल्याने त्याने दुकानदाराला गुगल पे (Google Pay) द्वारे १५ रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले. पोलिसांनी जेव्हा तांत्रिक तपास (Technical Analysis) सुरू केला, तेव्हा त्यांना या विविक्षित परिसरातील डिजिटल व्यवहारांची माहिती मिळाली. या १५ रुपयांच्या ऑनलाईन व्यवहारामुळे पोलिसांना आरोपीचे अचूक नाव, मोबाईल नंबर आणि त्याचे लोकेशन कळाले.
नेपाळला पळून जाण्याचा होता प्लॅन
गुगल पे च्या माध्यमातून पोलिसांना महत्त्वाचा सुगावा लागताच, गुन्हे शाखा आणि एटीएसच्या पथकांनी त्याच्या मांजरी येथील घरावर आणि कपड्याच्या दुकानावर छापा टाकला. तिथे पोलिसांना ऑनलाईन मागवलेल्या डिजिटल घड्याळाचे रिकामे बॉक्स आढळून आले, ज्यामुळे तोच मुख्य आरोपी असल्याची खात्री पटली. याशिवाय त्याच्या घरातून २ किलो अंमली पदार्थ (गांजा) देखील जप्त करण्यात आला.
दरम्यान, पुण्यात पोलिसांचा तपास सुरू झाल्याचे समजताच शिवाजीने शहरातून पळ काढला. त्याची बहीण नेपाळमध्ये राहत असल्याने, तो तिथून थेट नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यासाठी तो आझाद हिंद एक्सप्रेसने हावडाकडे जात होता. मात्र, एटीएसने तांत्रिक पाळत ठेवून त्याला नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर ट्रेन येताच झडप घालून ताब्यात घेतले.
४०० रुपयांच्या ‘बॉम्ब’साठी ४ लाखांचा सर्च ऑपरेशन
या एका डम्मी बॉम्बमुळे संपूर्ण पुणे पोलिसांची झोप उडाली होती. रुग्णालयातून १,००० पेक्षा जास्त रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (BDDS) तब्बल ७ तास मोहीम राबवून ते उपकरण मैदानावर नेऊन निकामी केले. आरोपीने हा बनावट बॉम्ब फक्त ४०० रुपयांत बनवला होता, मात्र त्याला शोधण्यासाठी पोलीस दलाचे तब्बल ४ लाख रुपयांहून अधिक बजेट खर्च झाले आणि सुमारे १,००० पोलीस कर्मचारी या मोहिमेत तैनात होते. आरोपीवर आता खंडणी मागणे, दहशत निर्माण करणे आणि अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.





