“सोलापूर झेडपीच्या डेप्युटी CEO स्मिता पाटील यांच्या विरोधात आझाद मैदानात रणशिंग; प्रियंका परंडे यांचे आमरण उपोषण”
मुंबई : निर्भीड समाचार News Desk
सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी CEO) स्मिता पाटील यांनी माध्यमिक शिक्षक मान्यता प्रकरणात केलेल्या कथित गैरव्यवहाराची SIT (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी व्हावी, या मागणीसाठी शिवसेना युवतीसेना प्रदेशाध्यक्षा आणि युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य प्रियंका परंडे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता देण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप प्रियंका परंडे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी त्यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र, ठोस कारवाई होत नसल्याने त्यांनी आता मुंबईत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
प्रियंका परंडे यांनी आपल्या समर्थकांसह आझाद मैदानात ठिय्या मांडला असून, जोपर्यंत सरकार या प्रकरणी SIT चौकशीची घोषणा करत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, मुंबईतील राजकीय वर्तुळाचेही याकडे लक्ष वेधले गेले आहे.





