पुण्यातून राजस्थानला ‘नीट’चा पेपर; १५० प्रश्नांसाठी १० लाखांचा सौदा!
मुंबई/पुणे : निर्भीड समाचार वृत्तसेवा
देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षा पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणाचा तपास करत असताना अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. मूळ प्रश्नपत्रिकेतील सुमारे १५० प्रश्न हुबेहूब जुळल्यास तब्बल १० लाख रुपयांचा सौदा ठरल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण पेपरफुटीचे मुख्य केंद्र महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे असल्याचे निष्पन्न झाले असून, हा पेपर पुण्यातून थेट राजस्थानपर्यंत पोहोचवला गेला. या रॅकेटमध्ये आता राज्यातील एका नामांकित आणि प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञाचीही (Pediatrician) सीबीआय चौकशी सुरू झाल्याने वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे
पुण्यातून राजस्थानला व्हाया टेलिग्राम असा झाला प्रवास
सीबीआयने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) च्या अंतर्गत यंत्रणेतील काही व्यक्तींचा वापर करून हा पेपर बाहेर काढण्यात आला. पुण्यातून मनीषा वाघमारे नामक महिलेच्या माध्यमातून हा गोपनीय डेटा लीक झाला आणि तो धनंजय निवृत्ती लोखंडे या संशयितापर्यंत पोहोचला. धनंजयने हा पेपर नाशिकमधील मेडिकल काउन्सलिंग एजन्सी चालवणाऱ्या शुभम खैरनार याला सोपवला. शुभम खैरनार याने २९ एप्रिल रोजी थेट टेलिग्राम (Telegram) ॲपचा वापर करून या लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ फाईल गुरुग्राममधील एका दलालाला पाठवली. तेथून हा महाघोटाळा पुढे राजस्थानमधील सीकर आणि चुरू जिल्ह्यांपर्यंत पसरला. राजस्थानमधील मंगीलाल खटीक याने या प्रश्नपत्रिकेच्या प्रिंट काढून स्वतःच्या मुलासह इतर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वीच त्याचे सर्रास वाटप केले होते.
१५० प्रश्नांसाठी १० ते १५ लाखांची ‘डील’
तपासादरम्यान समोर आलेली सर्वात मोठी बाब म्हणजे हा पेपर विकण्यासाठी विशिष्ट ‘पॅकेज’ ठरवण्यात आले होते. मुख्य परीक्षेतील किमान १५० प्रश्न जर मिळालेल्या ‘गेस पेपर’शी अचूक जुळले, तर प्रति विद्यार्थी १० लाख रुपये देण्याचा अंतिम सौदा निश्चित झाला होता. काही मध्यस्थांनी पालकांकडून या कामासाठी १५ ते २० लाख रुपये उकळल्याचेही सीबीआयच्या बँक खात्यांच्या तपासावरून स्पष्ट होत आहे.
‘एनटीए’चे घरचे भेदी आणि नामांकित बालरोगतज्ज्ञ रडारवर
या संपूर्ण घोटाळ्यात केवळ बाहेरील दलालच नाही, तर थेट प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या कमिटीमधील सदस्यच सामील असल्याचा पुरावा सीबीआयला मिळाला आहे. प्रल्हाद कुलकर्णी (नीट विषयतज्ज्ञ) आणि मनीषा मांढरे (एनटीए बॉटनी तज्ज्ञ) यांनीच अंतिम प्रश्नसंचाचा गैरवापर करून डेटा चोरी केल्याचा आरोप आहे.यात भर म्हणून, महाराष्ट्रातील एका नामांकित आणि मोठ्या बालरोगतज्ज्ञाचे (Pediatrician) नाव या रॅकेटशी जोडले गेले आहे. या बालरोगतज्ज्ञाने आपल्या ओळखीचा आणि प्रभावाचा वापर करून पुण्यातील मास्टरमाईंडशी संपर्क साधला होता आणि काही श्रीमंत पालकांकडून कोट्यवधी गोळा करून ते दलालांपर्यंत पोहोचवल्याचा संशय आहे. सीबीआयने या डॉक्टरांची कसून चौकशी सुरू केली असून, त्यांच्या पुण्यातील आणि लातूरमधील ठिकाणांवर छापे टाकून डिजिटल पुरावे जप्त केले आहेत.
प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ
३ मे रोजी झालेली ही परीक्षा कथित गैरप्रकारांमुळे रद्द करण्यात आली असून, आता ही परीक्षा ऑनलाइन किंवा नव्या नियमांनुसार घेण्याची तयारी सुरू आहे. मात्र, या पेपरफुटीमुळे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या तब्बल २३ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. पैशांच्या जोरावर डॉक्टर बनू पाहणाऱ्या या टोळीने शिक्षण व्यवस्थेचा बाजार मांडला असल्याची संतप्त प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहे.सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंतरराज्य साखळीत महाराष्ट्रातील आणखी काही बडे डॉक्टर, शिकवणी चालक आणि प्रशासकीय अधिकारी अडकण्याची दाट शक्यता असून, येत्या दोन दिवसांत आणखी काही मोठ्या अटक कारवाया पाहायला मिळू शकतात.





