कंगना रणौतच्या ‘त्या’ विधानावर चिन्मयी सुमीत भडकली! | दिलं सडेतोड उत्तर
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
आपल्या वादग्रस्त आणि रोखठोक विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) यांनी पुन्हा एकदा नव्या पिढीवर म्हणजेच ‘जेन-झी’ (Gen-Z) तरुण-तरुणींवर अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करून नव्या विवादाला तोंड फुटले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विद्यार्थी आंदोलनाचा संदर्भ देत कंगनाने तरुण पिढीला थेट ‘जनरेशन गटार’ आणि ‘गटर छाप’ असे संबोधले होते. कंगनाच्या या अत्यंत पातळीहीन वक्तव्यावर आता देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच, मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या चिन्मयी सुमीत (Chinmayee Sumeet) यांनी कंगनाचा समाचार घेत तिला जाहीरपणे सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
दिल्लीच्या जंतर-मंतरवर विविध मागण्यांसाठी झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या आंदोलनातील भाषा आणि रील संस्कृतीवर निशाणा साधत कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहून तरुणांवर अत्यंत बोचरी टीका केली.कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, “मी माझ्या आयुष्यात इतका कुरूपपणा एकाच ठिकाणी कधीच पाहिला नाही. जेन-झीच्या आंदोलनाचे हे रील पाहून किळस येते. त्यांच्या बोलण्याची पद्धत आणि भाषा अत्यंत घाणेरडी आहे. स्वतंत्र होण्यासाठी आधी ते कमवावे लागते, जबाबदारीशिवाय स्वतंत्र होऊ पाहणारे हे लोक केवळ ‘गटर छाप’ आहेत.” इतकेच नव्हे तर, तिने तरुणींवर आक्षेप घेत त्यांना अभ्यासात ढ, दारू-ड्रग्ज पिणाऱ्या आणि आई-वडिलांच्या पैशांवर ऐश करणाऱ्या अशा अत्यंत टोकाच्या शब्दांत सुनावले होते.
कंगनाच्या या विधानाचा समाचार घेताना चिन्मयी सुमीत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना तिची चांगलीच शाळा घेतली. चिन्मयी म्हणाल्या, “कंगना रणौतने वादग्रस्त वक्तव्य केले, या वाक्यालाच काही अर्थ नाही. कारण त्या जेव्हा जेव्हा बोलतात, ती विधाने वादग्रस्तच असतात. त्या एक उत्तम अभिनेत्री आहेत, ‘क्वीन’ सिनेमात त्या मला खूप आवडल्या होत्या. पण सध्या त्यांनी राजकारणात जी नवी भूमिका स्वीकारली आहे, त्यातही त्या आपले १०० टक्के देत आहेत. त्यांच्या पक्षाचे जे काही सुरू आहे की—सतत काहीतरी निरर्थक आणि बेसलेस गोष्टी बोलत राहायच्या, तेच काम त्या अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत.”
चिन्मयी सुमीत यांनी स्वतः या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि त्या प्रत्यक्ष तेथे उपस्थित होत्या. याचा दाखला देत त्या म्हणाल्या, “मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे की, तिथे ८० टक्के प्रत्यक्ष शिकणारी मुले होती आणि २० टक्के आमच्यासारखे त्यांना पाठिंबा देणारे नागरिक होते. माझ्यासोबत माझी स्वतःची दोन मुलेही त्या आंदोलनात सहभागी होती. त्यांच्या हातातील फलक, त्यांच्या घोषणा मी स्वतः पाहिल्या आहेत. काही मुलांची भाषा चुकीची असू शकते, पण संपूर्ण पिढीला किंवा आंदोलनाला बदनाम करणे पूर्णपणे चुकीचे आहे. संसदेच्या खिडकीतून पाहून कंगनाला कोणती आंतरिक शक्ती मिळाली, ज्यामुळे तिला तिथे विद्यार्थी दिसले नाहीत, हे देवच जाणे!”
तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर बोलताना चिन्मयी सुमीत यांनी थेट सरकारवर आणि कंगनाच्या मानसिकतेवर प्रहार केला. त्या म्हणाल्या, “देशात आधी बेरोजगारी वाढवायची, मुलांना नोकऱ्या मिळून द्यायच्या नाहीत, त्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करायचा आणि नंतर हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या त्याच तरुणांना ‘झुरळं’ किंवा ‘जनरेशन गटार’ म्हणून त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवायची, हा कसला प्रकार आहे? तुम्ही त्यांच्या अपमानावर अपमान करत आहात. दलदलीत एकदा पाय रोवला की माणूस कसा अधिक आत जातो, तशीच अवस्था या लोकांची झाली आहे. हे लोक जितकी घाण माजवतील, तितकेच स्वतः गाळात रुतत जातील. त्यांना लवकर चांगली बुद्धी मिळो आणि ते बरे होवोत, हीच माझी सदिच्छा!”
चिन्मयी सुमीत यांनी अत्यंत तिखट आणि संयत शब्दांत कंगनाला आरसा दाखवल्यामुळे सोशल मीडियावर सध्या त्यांच्या या भूमिकेचे कौतुक होत आहे. ‘जेन-झी’ तरुणांनीही चिन्मयी सुमीत यांच्या विधानाला पाठिंबा दिला असून, लोकप्रतिनिधी असलेल्या कंगनाने देशाच्या तरुण पिढीचा असा अपमान करणे थांबवावे, असा सूर उमटत आहे.





