अभिनेत्री मानसी कुलकर्णीच्या नव्या चित्रपटात तिची मुलगी करणार पदार्पण!


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

मराठी मनोरंजन विश्वामध्ये नात्यांचे बंध, कौटुंबिक कथा आणि त्यातील भावभावनांना नेहमीच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. कलाकार आणि त्यांच्या मुलांबद्दल, म्हणजेच कलाकारांच्या पुढच्या पिढीबद्दल प्रेक्षकांना नेहमीच एक विशेष कुतूहल आणि आकर्षण राहिले आहे. अशाच एका गोड आणि अत्यंत भावुक करणाऱ्या योगायोगामुळे आगामी मराठी चित्रपट ‘द्विधा’ सध्या सोशल मीडिया आणि सिनेविश्वात प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने लोकप्रिय अभिनेत्री मानसी कुलकर्णी आणि तिची लाडकी कन्या ओवी कुलकर्णी ही रिअल लाईफ माय-लेकीची जोडी पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

विशेष म्हणजे, या चित्रपटात ओवी केवळ एक बालकलाकार म्हणून काम करत नसून, ती तिची सख्खी आई मानसी कुलकर्णी हिने साकारलेल्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या बालपणीची भूमिका पडद्यावर जिवंत करणार आहे. ‘रिअल लाईफ’ लेक पडद्यावर आईच्या ‘रील लाईफ’ पात्राचे बालपण साकारणार असल्यामुळे प्रेक्षकांसाठी ही अभिनयाची जुगलबंदी पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे.

‘द्विधा’ या चित्रपटात अभिनेत्री मानसी कुलकर्णी ‘श्रावणी’ नावाचे एक मुख्य पात्र साकारत आहे. याच श्रावणीच्या लहानपणीचा प्रवास, तिचे बालपण आणि तिच्या आठवणी चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाचा दुवा आहेत. ही बालपणीची भूमिका तिची खरीखुरी मुलगी ओवी कुलकर्णी साकारत आहे. मनोरंजन विश्वात एकाच भूमिकेच्या दोन वेगवेगळ्या टप्प्यांसाठी खऱ्या आयुष्यातील आई-मुलीची निवड होणे, हा अत्यंत दुर्मिळ आणि सुंदर योग मानला जातो. ओवीचा अभिनय क्षेत्रातील हा अगदी पहिलाच अनुभव आहे. कोणताही पूर्वानुभव पाठीशी नसतानाही, ओवीने कॅमेऱ्यासमोर दाखवलेला आत्मविश्वास आणि तिच्या चेहऱ्यावरील निरागसतेने सेटवरील सर्वांचीच मने जिंकून घेतली आहेत.

Advertisement

आपल्याच पात्राचे बालपण मुलगी साकारत असल्यामुळे अभिनेत्री मानसी कुलकर्णी अत्यंत भावूक झाल्या आहेत. त्यांनी सांगितले की, ओवीने या पहिल्याच अनुभवात अभिनयातील सहजता आणि आत्मविश्वास दाखवला आहे, जो एका आईसाठी अभिमानास्पद आहे. तर, ओवीनेही सुरुवातीचे दडपण आणि टीमने दिलेल्या पाठिंब्यामुळे हा अभिनय प्रवास सोपा झाल्याचे व्यक्त केले आहे.

‘द्विधा’ हा कौटुंबिक आणि भावनिक नातेसंबंधांवर भाष्य करणारा चित्रपट असून, याचे लेखन-दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांनी, तर निर्मिती विदुला रमेश आजगावकर यांनी केली आहे. या चित्रपटात मानसी आणि ओवीसोबतच सतीश पुळेकर, रेणुका दफ्तरदार, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत आणि हेमांगी वेळणकर अशी मोठी स्टारकास्ट आहे. तसेच, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निमिष कुलकर्णी ‘आदित्य’च्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘विजेता’ चित्रपटातून छाप पाडल्यानंतर मानसी आता ‘द्विधा’ मधून प्रेक्षकांसमोर येत आहेत, तर ओवीच्या रुपाने कुलकर्णी कुटुंबातील पुढची पिढी सिनेसृष्टीत पाऊल टाकत आहे. हा कौटुंबिक पट असलेला ‘द्विधा’ चित्रपट २१ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x