धक्कादायक! मालाडमध्ये फळांना उंदीर मारण्याचे औषध लावून विक्री करणाऱ्या दोघांना अटक..!!
मुंबई: निर्भीड समाचार News Desk
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात फळांना उंदीर मारण्याचे औषध (Rat Poison) लावून त्यांची विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांना मालाड पोलिसांनी अटक केली आहे. मनोज कुमार केसरवानी (वय ४२) आणि बिपिन केसरवानी (ज्यांची ओळख काही ठिकाणी राहुल सदनलाल केसरवानी अशीही नमूद आहे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये हे विक्रेते केळी आणि इतर फळांना ‘रॅटोल’ (Ratol) नावाचे घातक विष लावत असल्याचे दिसून आले.एका जागरूक नागरिकाने या कृत्याचा व्हिडिओ बनवून पोलिसांकडे तक्रार केली. व्हिडिओमध्ये एक विक्रेता फळांना विष लावताना दिसत असून विचारणा केल्यावर “उंदीर फळांचे नुकसान करू नयेत म्हणून हे करत आहोत,” असे धक्कादायक उत्तर त्याने दिले होते.
स्थानिक रहिवासी कुणाल साळुंखेयांनी दिलेल्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १२५, २७४, २७५ आणि २८६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने (BMC) संबंधित विक्रेत्यांचे दुकान किंवा गाडा तात्काळ सील केला आहे.
या फळांवर लावलेल्या विषामध्ये ‘यलो फॉस्फरस’ (Yellow Phosphorus) असते, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. याचे सेवन केल्यास उलट्या, पोटदुखी, यकृताचे (Liver) गंभीर नुकसान किंवा मृत्यूदेखील ओढवू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.नागरिकांनी फळे खरेदी करताना अधिक सतर्क राहावे आणि अशा कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





