पोर्शे प्रकरणातील आरोपीच्या मित्रांचा धक्कादायक खुलासा
पुण्यात कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघातामध्ये अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात अनेक नवनवीन माहिती समोर येत आहेत.
अपघातावेळी कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा जबाब समोर आला आहे. त्यांनी आरोपी मुलाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, पोर्शे अपघात प्रकरणात मागच्या सीट वर बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी आपला जबाब नोंदवला आहे.
आरोपी अल्पवयीन मुलाने दारू पिऊन वेगाने गाडी चालवत अपघात केला असल्याचं या दोन मुलांनी जबाबात सांगितल्याचं समोर आलं आहे. आता या मुलांना पोलीस संबंधित खटल्यात साक्षीदार करणार असल्याचं काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
आरोपी मुलाच्या ब्लड टेस्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, ससून रुग्णालयमधील डॉक्टर अजय तावरे यांच्यासह अजून दोन डॉक्टर, विशाल अग्रवालचे वडील तथा आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल पोलीस कस्टडीमध्ये आहेत. तर,आरोपी मुलगा हा बाल सुधारणा गृहात आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या प्रकरणात अल्पवयीन आरोपीची चौकशी करायची आहे. त्यांनी त्या संदर्भात बाल न्याय मंडळाला पत्र देखील पाठवले आहे. आरोपी मुलाची आई देखील या प्रकरणात अडकली असून त्या सध्या फरार असल्याची माहिती आहे.
बाल न्याय मंडळानं चौकशीची परवानगी दिल्यास अल्पवयीन आरोपीची चौकशी ही त्याचे वकील किंवा दुसऱ्या नातेवाईकांसमोर होऊ शकते. पुण्यातील या घटनेमध्ये अनेक धागेदोरे सापडत आहेत. आता या प्रकरणी पुढे काय होतं, ते पाहावं लागेल.





