पब आणि बार चालकांना दणका
पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरण अजूनही चर्चेत आहे. या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. बिल्डर विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने नशेत कार चालवून दोघांना उडवलं.
या अपघातापूर्वी अल्पवयीन आरोपी व त्याचे काही मित्र पार्टी करण्यासाठी पबमध्ये गेले होते. पब मधे त्यांनी मद्यप्राशन केले होते. त्यांचे व्हिडीओही समोर आले होते. यानंतर अल्पवयीन मुलांना दारू दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या अपघातानंतर पुण्यातील इतर पब आणि बार मालकांचे धाबे दणाणले आहेत. पुणे पोलिसांच्या कामगिरीवर देखील यावरून मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आता या अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लघंन करणारे पब आणि बार रेस्टॉरंट यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी घेतलेल्या बैठकीत मोठे निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, याबाबत मोठे निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
१) परवाना कक्षा मध्ये २१ ते २५ वयाखालील व्यक्तीनां बियर/मद्य विक्री केल्यास आस्थापनांवर कडक कारवाई केली जाणार.
२) उत्पादन शुल्क विभागाने नियमाने दिलेल्या वेळेनंतर अनुद्यप्ति सुरू असल्यास कारवाई केली जाणार.
३) शहरी भागात दीडवाजेपर्यंत तर ग्रामीण भागात 11 वाजेपर्यंतच आस्थापन सुरू ठेवण्याच्या सूचना.
४) हॉटेलच्या ओपन टेरेसवर मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार.
५) विनापरवाना मद्यसाठा मिळुन आल्यास कायदेशीर कारवाई करावी व संबधित मद्यसाठाचे सखोल निरीक्षण करावे.
६) महिला वेटर यांना विहित वेळेनंतर कार्यरत असल्यास कारवाई संबधित आस्थापनावर कडक कारवाईच्या सूचना.
७) तसेच कार्यक्षेत्रातील सर्व ब्लॅक लिस्टेड परमिट रूम व बियर शॉप यांनी एफएल-१ ट्रेड मधुन Cash and Carry scheme पध्दतीने मद्यसाठा ख़रेदी करने बंधनकारक राहणार आहे.
तसेच विभागातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेऊन, गोडाऊन आणि कारखान्यावरील उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांची त्या त्या विभागीय कार्यालयात नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.





