माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या
राज्यात गुन्हेगारीच्या घटनेमधे दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशातच आता जळगावच्या भुसावळ शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. भुसावळ शहरात अज्ञातांनी गोळीबार केला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे भुसावळमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असं की, जळगावच्या भुसावळ शहरात अज्ञातांनी गोळीबार केला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांमध्ये एका माजी नगरसेवकाचा समावेश असून त्यांचा एक सहकारी देखील आहे. मात्र या गोळीबाराच्या घटनेत ते दोघेही मृत्युमुखी पडले आहेत. भुसावळ शहरातील जुना सातारा रोड भागात कारमधून जात असलेल्या चौघांवर अज्ञातांनी अचानकपणे गोळीबार केल्याची घटना घडली. यावेळी दोघांवर गोळीबार झाला त्यामुळे दोन जण मृत्युमुखी पडले आहेत.
भुसावळ शहरात झालेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या माजी नगरसेवकाचे नाव संतोष बारसे असे होते. बारसे यांच्यासोबत इतर तिघे जण कारमधून जात असताना त्यांच्या कारवर अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. मात्र गोळीबारात संतोष बारसेंसह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र या घटनेनं संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
हा सर्व प्रकार मरिमाता मंदिर परिसराजवळ झाला आहे. यामध्ये कार घटनास्थळी येताच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याने ते कार मध्येच जागेवर कोसळले होते. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले.
या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तातडीने संपूर्ण भुसावळ शहरात नाकाबंदी करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र आरोपी फरार असल्याने आरोपीला अद्याप तरी अटक करण्यात आली नाही. मात्र ही संपूर्ण घटना व त्यामागचं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र यासंदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत.





