‘बेस्ट’चे खासगीकरण रोखा, कामगारांना न्याय द्या; शिवसेना (UBT) शिष्टमंडळाने गाठले ‘बेस्ट’ भवन..!!
बातमी : निर्भीड समाचार न्यूज डेस्क
मुंबई: मुंबईची सार्वजनिक वाहिनी असलेली ‘बेस्ट’ वाचवण्यासाठी आणि त्याचे खासगीकरण रोखण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आता कंबर कसली आहे. आज ‘बेस्ट’ भवन येथे मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि माजी विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने बेस्ट समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ. तृष्णा विश्वासराव यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान, बेस्ट उपक्रमाचे खासगीकरण पूर्णपणे थांबवण्यात यावे आणि बेस्ट कामगारांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ मार्गी लावण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी पक्षाच्या वतीने त्यांना अधिकृत निवेदन देण्यात आले. “बेस्ट ही मुंबईची शान आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत वाचलीच पाहिजे,” अशी आग्रही भूमिका यावेळी किशोरीताई पेडणेकर यांनी मांडली.
याप्रसंगी शिवसेना उपनेते आणि बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर, नगरसेवक सचिन पाटील, सुनील आहीर, माजी नगरसेवक सुनील मोरे, अंकित प्रभू, तसेच बेस्ट कामगार सेनेचे पदाधिकारी, शाखाधिकारी सचिन भुवड, गटप्रमुख सचिन नलावडे आणि इतर अनेक शिवसैनिक व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईकरांच्या प्रवासाचा हक्क आणि कामगारांचा न्याय यासाठी येणाऱ्या काळात शिवसेना (UBT) अधिक तीव्र संघर्ष करेल, असा इशाराही यावेळी उपस्थित नेत्यांनी दिला.
“बेस्ट वाचली, तरच मुंबईचा सर्वसामान्य माणूस वाचेल. खासगीकरणाच्या नावाखाली या संस्थेचे लचके तोडणे आम्ही सहन करणार नाही,” असा इशारा यावेळी शिष्टमंडळाने दिला. सभापती तृष्णा विश्वासराव यांनीही या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले.





