‘मिशन सफल’साठी मुंबई पालिकेचा ४२४८.०८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर..!!
मुंबई: निर्भीड समाचार News Desk
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शिक्षण समितीने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ४२४८.०८ कोटी रुपयांचा भव्य अर्थसंकल्प आज सादर केला. महापालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी हा अर्थसंकल्प शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्याकडे सुपूर्द केला.
गतवर्षीच्या ३,६७४ कोटींच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे ७.४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यावेळच्या अर्थसंकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेले ‘मिशन सफल’
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे:
मिशन सफल: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांचे शारीरिक कौशल्य, स्काऊट-गाइड, संगीत आणि कला या क्षेत्रांत प्रगती व्हावी, या उद्देशाने हे विशेष मिशन राबवले जाणार आहे.
डिजिटल शिक्षण: इयत्ता ९ वीच्या १९,३१७ विद्यार्थ्यांना टॅबलेट वाटप करण्यासाठी २१.८३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ७,९५३ वर्गखोल्या डिजिटल केल्या जातील.
शाळा पायाभूत सुविधा: नवीन शाळांचे बांधकाम आणि जुन्या शाळांच्या दुरुस्तीसाठी ४९० कोटी रुपयांची भांडवली तरतूद करण्यात आली आहे.
खगोलशास्त्र प्रयोगशाळा: मुंबईतील आणखी ४० शाळांमध्ये खगोलशास्त्र प्रयोगशाळा (Astronomy Labs) सुरू केल्या जातील. तसेच शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी ४२ कोटी आणि विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी १८७.५७ कोटींची तरतूद केली आहे.
चांगले शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे, ती कोणतीही सवलत नाही, असे स्पष्ट मत आयुक्त भूषण गगराणी यांनी यावेळी व्यक्त केले. मुंबईतील महानगरपालिका शाळांना ‘हायटेक’ करून जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा पालिकेचा मानस या अर्थसंकल्पातून दिसून येतो.





