“मुंबई आता कात टाकणार! अनधिकृत फेरीवाल्यांवर आयुक्तांचा ‘हॅमर’; दादरमध्ये गगराणींची धडक पाहणी.!!”
बातमी : निर्भीड समाचार न्यूज डेस्क
मुंबई: मुंबई महानगरातील रस्ते आणि पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्यासाठी, तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मोहिमेची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी आज एफ/दक्षिण, एफ/उत्तर आणि जी/उत्तर विभागांत अचानक पाहणी दौरा केला. विशेषतः दादर परिसरातील कारवाईचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी केवळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली नाही, तर स्थानिक व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला. अनधिकृत फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि पदपथांवर चालताना होणारी कसरत याबाबत नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे रस्ते मोकळे होत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यावेळी माध्यमांशी आणि नागरिकांशी बोलताना आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, “ही मोहीम केवळ दंड वसूल करण्यासाठी नसून, नागरी सुव्यवस्था राखणे, वाहतूक सुरळीत करणे आणि पादचाऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. माननीय न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन केले जाईल आणि यापुढे अतिक्रमणविरोधी कारवाई अधिक कठोर केली जाईल.”
मुंबईला स्वच्छ आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अनिवार्य असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात पालिकेची ही ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम अशीच सुरू राहणार असून, नागरिकांनी प्रशासनाला सक्रिय साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या पाहणी दौऱ्यावेळी उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (विशेष) श्री. विनायक विसपुते यांच्यासह संबंधित विभागांचे सहायक आयुक्त, वरिष्ठ अधिकारी आणि अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आता मुंबईचे रस्ते खरोखरच ‘फेरीवाला मुक्त’ होणार का? याकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.





