परळमध्ये फेरीवाल्यांचा एल्गार! कारवाईविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यावर धडक शिष्टमंडळ..!!
बातमी : निर्भीड समाचार न्यूज डेस्क
मुंबई: परळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेल्या अनपेक्षित तोडक कारवाईचे पडसाद आता उमटू लागले आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ ‘परळ फेरीवाला संघटने’च्या वतीने आज भोईवाडा पोलीस स्टेशनवर एक भव्य सामूहिक शिष्टमंडळ नेण्यात आले. यावेळी फेरीवाल्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासनाला सादर केले.

संघटनेच्या प्रतिनिधींनी भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. ठाकूर साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. “फेरीवाल्यांवर कारवाई करताना केंद्र सरकारच्या ‘पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व फेरीवाला विनियमन) अधिनियम २०१४’ (Vending Act 2014) ची पायमल्ली होत आहे. या कायद्याची तातडीने आणि कायदेशीर अंमलबजावणी करावी,” अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. परळमध्ये दोन-दोन पिढ्यांपासून व्यवसाय करत असलेल्या स्थानिक पथविक्रेत्यांची यादी आणि इतर पुरावेही पोलिसांसमोर सादर करण्यात आले.
फेरीवाल्यांमध्ये घुसखोर रोहिंग्या किंवा बांगलादेशी असल्याच्या चर्चांवर संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला. “जे कोणी आम्हाला रोहिंग्या किंवा बांगलादेशी म्हणत असतील, त्यांना समोर बोलवा, आम्ही इथेच थांबलो आहोत,” असे खुले आव्हान फेरीवाल्यांनी दिले. तसेच, कारवाई दरम्यान महिला फेरीवाल्यांशी होणारी ‘अरे-तुरे’ची भाषा आणि गैरवर्तन थांबवून त्यांना सन्मानाने वागवावे, अशी विनंतीही पोलीस प्रशासनाला करण्यात आली.
पोलीस स्टेशनमधील चर्चेनंतर परळ येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात फेरीवाल्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी २६ तारखेला मुंबई आणि महामुंबई विभागातील सर्व फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींची एकत्र बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेण्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“मुंबईतील फेरीवाल्यांवरील अन्यायकारक कारवाई थांबवा आणि २०१४ चा कायदा लागू करा,” असा नारा देत फेरीवाल्यांनी आपल्या एकजुटीचा निर्धार व्यक्त केला आहे.





