भारतमाता विद्यालय, क्रांती नगर (कांदिवली पूर्व): ‘उडान २०२६’ क्रीडा सोहळा उत्साहात संपन्न..!!
कांदिवली प्रतिनिधि, मुंबई :
जिद्द, आत्मविश्वास आणि निखळ उत्साहाच्या जोरावर क्रांती नगर, कांदिवली (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था संचालित भारतमाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘उडान २०२६’ या क्रीडा दिनानिमित्त सावित्रीबाई फुले मैदान गाजवून सोडले. लियो क्लब ऑफ कांदिवली लोखंडवाला टाऊनशिप तर्फे आयोजित या सोहळ्यात २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले.

सकाळी ८ वाजल्यापासूनच इयत्ता १ ली ते ४ थी च्या चिमुकल्यांच्या किलबिलाटाने आणि उत्साहाने मैदान बहरून गेले होते. केवळ स्पर्धा म्हणून नव्हे, तर शारीरिक व्यायाम आणि मुलांमधील संघभावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने या ‘स्पोर्ट्स डे’चे आयोजन करण्यात आले होते. विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह आणि शिस्त उपस्थितांची मने जिंकून घेणारी ठरली.

या उपक्रमाबाबत बोलताना आयोजकांनी सांगितले की, लिओ क्लबच्या #BeyondTheRoar या ब्रीदवाक्याला अनुसरून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच या कार्यक्रमाची खरी पावती आहे.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी भारतमाता विद्यालयाचे शिक्षक वृंद, लिओ क्लबचे स्वयंसेवक आणि पालकांनी विशेष मेहनत घेतली. शिस्तबद्ध नियोजन आणि मुलांच्या सुरक्षिततेची घेतलेली काळजी यामुळे हा क्रीडा दिन खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.





