कुरार पोलीस ठाण्याचा भ्रष्ट चेहरा उघड! वरिष्ठ निरीक्षक तावडेंकडे सापडले लाचेचे घबाड; एसीबीची धडाकेबाज कारवाई..!!


प्रतिनिधी,मुंबई: कर्तव्यदक्षतेचा आव आणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा खरा चेहरा समोर आला आहे. मालाड पूर्व येथील कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुत्रे यांना १ लाख रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने (ACB) रंगेहात अटक केली आहे. एका फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.

एका ३५ वर्षीय तक्रारदाराच्या विरोधात एका वकिलाने फसवणुकीची तक्रार केली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि कायदेशीर कारवाईत सवलत देण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांनी ३ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, एसीबीने बुधवारी (१८ फेब्रुवारी २०२६) कुरार पोलीस ठाण्यात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने १ लाख रुपयांचा हप्ता तावडे यांच्या सांगण्यावरून पीएसआय जुत्रे यांना दिला. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले.

Advertisement

अटकेनंतर एसीबीच्या पथकाने पोलीस ठाण्यातील तावडे यांच्या कॅबिनची आणि घराची झडती घेतली. यावेळी ६ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम आणि काही संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे उत्तर मुंबईतील पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा तपास आता एसीबी करत आहे.

नागरिकांना आवाहन:

जर तुमच्याकडे कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल, तर घाबरू नका. तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा किंवा एसीबी महाराष्ट्रच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x