पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीच्या अर्जाचा फोटो घेणे गुन्हा नाही- मुंबई हायकोर्ट..!!
मुंबई : पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या लेखी तक्रारींचे मोबाईलमध्ये फोटो घेतल्याबद्दल ठाणे पोलिसांनी ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट अंतर्गत दाखल केलेला हेरगिरीचा गुन्हा मुंबई हायकोर्टाने रद्द केला. २० एप्रिल २०२२ रोजी झिशान सिद्दीकीला त्याच्याविरुद्धच्या अर्ज चौकशीसाठी मीरा रोड पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. चौकशीदरम्यान सिद्दीकीने त्याच्याविरुद्धच्या अर्जाची प्रत मागितली. त्याला वाचण्यासाठी अर्ज देण्यात आला. पण त्याने जेव्हा अर्जाची प्रत मागितली तेव्हा त्याला ती देण्यास नकार देण्यात आला. त्याने मोबाईल मध्ये अर्जाचा फोटो आणि व्हिडीओ घेतला म्हणून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट कलम तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सिद्दीकीने हा खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.
पोलिस स्टेशन हे कायद्याप्रमाणे निषिद्ध ठिकाण घोषित केलेले नाही. पोलिस ठाण्यात फोटो घेणे ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्टचा गुन्हा होत नाही, असे मत नोंदवत न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला. तसेच सरकारने याचिकाकर्त्यास २५ हजार रुपये नुकसान भरपाई देऊन व तो चुकीचा FIR दाखल करणाऱ्या आणि त्या चार्जशीटला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून ती भरपाई वसूल करण्यात यावी असे आदेश दिले. अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांकडून या कायद्याच्या तरतुदीचा गैरवापर होत असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.
पोलिस स्टेशन मध्ये लोकांना मुक्तपणे येता आले पाहिजे. ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्टच्या गुन्ह्याचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या नोकरी आणि प्रतिष्ठेवर होऊ नये, असे मत न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. आर. एन. लड्डा यांनी व्यक्त केले.





